
करमाळा प्रतिनिधी
माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलीका वितरण प्रणालीचे काम सुरू करण्यासाठी 116 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन डिसेंबर 2023 मध्ये प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात झाली होती. युद्धपातळीवर हे काम सुरू असतानाच नोव्हेंबर 2024 मध्ये सत्तांतर घडले आणि त्यानंतर सदर योजनेचे काम बंद पाडण्यात आले. हे काम बंद पाडल्याबद्दल अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असताना या बंद नलिका वितरण प्रणालीचे काम सुरू करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

अखेर या आंदोलनाला मोठे यश आले असून दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिकेचे काम सुरू झाले आहे. स्व. अजितदादा पवार यांनी या योजनेसाठी भरीव निधी दिलेला होता. हे काम बंद पडल्यानंतर अजित दादांच्या कानावरती ही आपण हा प्रकार घातलेला होता. अखेर आंदोलनाला आणि आपल्या प्रयत्नाला यश आल्यामुळे हे काम सुरू झाले असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती करमाळ्याचे नवनियुक्त सदस्य भरत भाऊ अवताडे यांनी दिली आहे.

…………………
बंद नलिका वितरण प्रणालीचा विरोध का मावळला ? – अॅड. अजित विघ्ने प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
यावरून मतदार संघामध्ये सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहेत. आमदार पदाची शपथ घेतल्यानंतर विद्यमान आमदार नारायण पाटील तसेच त्यांचे प्रवक्ते यांच्याकडून वारंवार ही योजना चुकीची आहे. या बंद नलिकेमुळे पर्क्युलेशन होणार नाही म्हणून आमचा शेतकरी हितासाठी या योजनेला विरोध आहे असे ठामपणे सांगितले जात होते. प्रत्यक्षात टक्केवारीसाठी हे काम बंद पाडल्याच्या चर्चा मतदारसंघांमध्ये सुरू होत्या. याच कालावधीत दोन वेळा पाईप जाळल्याच्याही घटना घडल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे असे घडले असेल असे आमदार कार्यालयाकडून स्पष्टीकरण दिले गेले होते. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. आणि बंद नलिका वितरण प्रणालीचेही काम सुरू आहे. नेमका आमदारांचा विरोध कशामुळे मावळला या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे.