
करमाळा प्रतिनिधी
केम रुपांतरीत साठवण तलाव, ता. करमाळा, जि. सोलापूर या सुमारे २.९४ कोटी रु. किंमतीच्या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर व शेतकरी यांनी मागणी केली आहे.

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, संभाजीनगर यांनी सदर कामास मान्यता दिली असून प्रत्यक्षात धरणास आवश्यक ग्राउटिंग न करता देयके मंजूर करण्यात आल्याचा आरोप आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस होऊनही तलावात पाणी साठत नसल्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळालेला नाही.

या संदर्भात यापूर्वी २२ ऑक्टोबर व १३ नोव्हेंबर २०२५ रोजी लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदार शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांचे देयक रोखण्याची मागणीही करण्यात आली होती. आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रादेशिक जलसंधारण अधिकारी (दक्षता व गुणनियंत्रण), पुणे यांच्यामार्फत चौकशीचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र ६० दिवस उलटूनही प्रत्यक्ष पाहणी किंवा अहवाल सादर करण्यात आलेला नाही.
१६ डिसेंबर २०२५ रोजी मुख्य अभियंता, मृदा व जलसंधारण विभाग, पुणे कार्यालयात २४ डिसेंबरला स्थळ पाहणीचे पत्र देण्यात आले; तरीही प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने आर्थिक संगनमताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तरीही तात्काळ उच्चस्तरीय चौकशी, अहवाल सार्वजनिक करणे व दोषींवर फौजदारी कारवाई न झाल्यास दिनांक १२ मार्च २०२६ रोजी मंत्रालयासमोर व जलसंधारण विभाग सचिवांच्या दालनासमोर महिला मोर्चा व आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवनेरी कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात (सन २०२५ रोजी) ब्लॅक लिस्ट करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तरी देखील अधिकारी कुठलीही अद्याप पर्यंत दखल घेतलीली दिसून येत नाही. यामध्ये दक्षता व गुणनियंत्रण मृदा व जलसंधारण अधिकारी सुहास गायकवाड, मुख्य अभियंता नितीन दुसाने, उपअभियंता चेतन कलशेट्टी (मृदा व जलसंधारण विभाग येरवडा पुणे ६), कार्यकारी अभियंता सोलापूर राहुल क्षीरसागर यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केलेली आढळून येत नाही तरी त्यांचीही sit चौकशी करावी. त्यामुळे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी व संदीप तळेकर व संबंधित शेतकरी बांधवांना घेऊन १२ मार्च रोजी मुंबई मंत्रालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे.