१० शेतीपंप फोडले; १०५ किलो तांब्याची तार लंपास, लाखोंचे नुकसान

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना दिवेगव्हाण परिसरातील शेतकऱ्यांसमोर चोरीचे नवे संकट उभे राहिले आहे. पारेवाडी तलाव परिसरातील सहा शेतकऱ्यांच्या तब्बल १० विद्युत शेतीपंपांच्या मोटारी फोडून त्यातील सुमारे १०५ किलो तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
२३ सप्टेंबरच्या रात्री ही चोरी झाल्याचे समोर आले. २४ सप्टेंबर रोजी सकाळी शेतकरी अभिमन्यू संभाजी खाटमोडे हे मोटार सुरू करण्यासाठी गेले असता मोटारींचे नट-बोल्ट उघडून कव्हर फोडलेल्या अवस्थेत आढळले. पाहणी केली असता १० मोटारींची तोडफोड करून त्यातील तांब्याच्या तारा काढून नेल्याचे निदर्शनास आले.

पारेवाडी तलावात पाणीसाठा नसल्याने शेतकरी विहिरी व कूपनलिकांवर अवलंबून आहेत. केळी व ऊस यांसारखी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून शेतीपंप बसविले आहेत. मोटारींची तोडफोड झाल्याने सिंचन व्यवस्थेलाच मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणी अभिमन्यू खाटमोडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये चोरीच्या मालमत्तेचे मूल्य ७३ हजार ५०० रुपये नमूद आहे. मात्र मोटारींची तोडफोड, कॉपर वाइंडिंग, पार्ट्स व दुरुस्तीचा खर्च धरता प्रत्यक्ष नुकसान मोठे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पश्चिम करमाळ्यातील वाशिंबे, जिंती, पारेवाडी, केत्तूर-२, गोयेगाव, सोगाव व राजुरी परिसरात यापूर्वीही मोटार चोरीच्या घटना घडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या सर्व घटनांची साखळी तपासून चोरीच्या तांब्याचा माग काढावा, तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.