करमाळा प्रतिनिधी  

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामधे शेतकऱ्यांना कृषी कर्ज माफीचा लाभ देण्यात आला असुन, इंदापुर आणि करमाळा तालुक्यातील आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचे मराठवाडयाशी कनेक्शन करणारा पर्यटन मार्ग म्हणून ज्या रस्ते व पुलाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. तो महत्वाचा चांडगाव ता. इंदापुर ते पोमलवाडी ता. करमाळा दरम्यानचा उजनी वरील पुलास तब्बल ३४० कोटी मंजुर करण्यात आले आहेत. या पुलाची मागणी गेली बऱ्याच दिवसांपासुनची होती. आजही या ठिकाणावरून बोटीच्या सहाय्याने प्रवासी वहातुक होते. मध्यंतरी कुगाव ते कळाशीचे दरम्यान झालेल्या बोट दुर्घटने नंतर स्व. अजितदादा पवार यांनी शिरसोडी ते कुगाव पुलास मंजुरी दिलेली होती व त्याचे कामही प्रगती पथावर आहे. त्यानंतर अजितदादांकडे मागणी करण्यात आलेल्या चांडगाव ते पोमलवाडी पुलही लवकरच

साकारू असे अभिवचन दादांनी दिलेले होते. याकरिता करमाळाचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचेकडे ॲड. अजित विघ्ने, अशोक पाटील, सुर्यकांत पाटील, सुनील ढवळे, सचिन वेळेकर, प्रशांत नवले, नरेंद्र ठाकुर, उदय पाटील यांचेसह ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणीचा पाठपुरावा केला होता. मा. आ. संजयमामा शिंदे यांनी या पुलाचे संदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मागणीचे निवेदनही सादर केले होते. याबाबत स्व. अजितदादा पवार यांनी इंदापुरचे आमदार व कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांना याबाबत संबधित पुलासाठी कसल्याही परिस्थितीत निधी द्यायचा असे सुचित केले होते. यासाठी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचाही सततचा पाठपुरावा चालुच होता. विशेषतः गत विधानसभा निवडणुकीत मंत्री दत्तामामा भरणे यांनी त्यांचे जाहिरनाम्यात उल्लेख करून या भागातील जनतेला पुल मंजुर करण्याचे वेळोवेळी अभिवचन दिले होते. याबाबत वेळोवेळी पुरवणी बजेट मधेही प्रयत्न केले होते. अखेर सार्वजनिक बांधकाम खाते.

पुणे यांचेकडील चांडगाव ता. इंदापुर ते पोमलवाडी ता. करमाळा या दरम्यानच्या उजनीवरील पुलाचे कामाकरीता तब्बल ३४० कोटींचा निधी महाराष्ट्र सरकारने सन-२०२६ चे अर्थसंकल्पात निधी मंजुर केलेला असुन याबाबतची बातमी कळताच नुतन पंचायत समिती सदस्य ॲड. अजित विघ्ने व केत्तुर, पोमलवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी जल्लोष केला व या पुलास स्व.अजितदादा पवार यांचे नाव देण्याचे बाबत आग्रह धरला आहे. याबाबत स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापुरचे एका कार्यक्रमात या पुलाचे कामाबाबत केलेली घोषणा बाबतचे भाषण अनेकांनी व्हायरल केले असुन दादांना भावपुर्ण आदरांजली देखिल वाहीली आहे. लवकरच आता उजनीवर आता हा नवीन पुल व नवीन मार्ग अस्तित्वात येणार असुन हा मध्यवर्ती पुल विकासाचा राजमार्ग ठरणार आहे. सदर पुलाचे मंजुरी बद्दल ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहीनी पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कृषीमंत्री व इंदापुरचे आमदार दत्तामामा भरणे, करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे व राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *