
करमाळा प्रतिनिधी
महसूल विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत भटक्या-विमुक्त हक्क प्रमाणपत्र अभियान कंदर येथे उत्साहात पार पडले. या अभियानाला भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
करमाळा तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित या शिबिरात तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अशासकीय सदस्य नितीन कांबळे तसेच कंदर गावचे सरपंच मावला मुलाणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरामध्ये भटक्या-विमुक्त जाती व जमातीतील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिक्षणविषयक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्रांबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.

तसेच प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीएम किसान योजना आदी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी महसूल, पंचायत समिती, कृषी, आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, संजय गांधी योजना, निवडणूक शाखा आदी विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांनी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होत विविध प्रमाणपत्रे व शासकीय योजनांसंदर्भात माहिती घेतली. अभियानामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यास नागरिकांना मदत झाली.