जेआरडी माझा

कर्नाटक सरकारतर्फे चित्रकला शिल्पी डी. व्ही. हलभावी नॅशनल मेमोरियल, धारवाड यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा “युवा कुंचाकलाश्री पुरस्कार – 2025” हा पुरस्कार करमाळा येथील चित्रकार दिपाली संदेश खुळे यांना प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा डी. व्ही. हलभावी यांच्या जयंतीनिमित्त कर्नाटक राज्यातील धारवाड येथे पार पडला. दिपाली खुळे यांना प्रशस्तिपत्रकासोबत पंचवीस हजार रुपयांचे मानधन देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी भारतभरातील निवडक चार चित्रकारांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान दिपाली खुळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसाठी व कला रसिकांसाठी चित्र प्रात्यक्षिक सादर केले. तसेच आपल्या बारा वर्षांच्या चित्रकला प्रवासाचा सुंदर स्लाईडशो सादर करून कलाविषयक अनुभव, प्रवास आणि दृष्टिकोन मांडला.

दिपाली खुळे गेली बारा वर्षे चित्रकला क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी दुबई, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बेंगळुरू आदी ठिकाणी अनेक गट प्रदर्शनांत सहभाग घेतला आहे. मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरी येथे त्यांच्या दोन एकल प्रदर्शनांचे आयोजन झाले असून येत्या 2026 साली पुन्हा एक एकल प्रदर्शन निर्धारित आहे.

त्यांच्या चित्रांची मध्यवर्ती संकल्पना म्हणजे लहान मुलगी ते परिपक्व स्त्री आणि मातृत्वापर्यंतचा भावनिक प्रवास. या प्रवासाबद्दल बोलताना दिपाली म्हणतात— “डोळ्यात स्वप्ने घेऊन कल्पनांच्या जगात रंग भरत मोठी होणारी एक छोटी मुलगी… जीवनातील आव्हानांना सामोरी जात स्वतःची ओळख शोधते आणि एका दिवसात स्त्री म्हणून उभी राहते. पुढे मातृत्व स्वीकारताना ती विश्वाची आई बनते. निष्पाप बालपणापासून सर्जनशील मातृत्वापर्यंतचा हा प्रवासच माझ्या चित्रांचा आत्मा आहे.”

रंग, रेषा व भावनांच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रवास व्यक्त करताना त्या कधी मुलींची स्वप्ने उजळ रंगांनी सजवतात, तर कधी मध्यम छटांत तिचे विचार रेखाटतात. कधी चित्रांमध्ये प्रश्न दडलेले असतात, तर कधी हास्यातून जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न दिसतो. त्यांची कला स्त्री ही केवळ व्यक्तिरेखा नसून एक प्रक्रिया, शक्ती आणि सततचा प्रवास आहे—हा संदेश पुढे नेते.

दिपाली पुढे सांगतात, “माझ्या प्रत्येक चित्रातून एक कथा सांगण्याची इच्छा असते—अशी कथा, जी प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करेल आणि त्यांना विचार करायला भाग पाडेल.”

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *