करमाळा प्रतिनिधी

ऑगस्ट महिना संपत आला असताना देखील अद्यापही पावसाने दडी मारल्यामुळे करमाळा तालुक्यात या वर्षाचे खरीप हंगामातील पावसाअभावी उडीद, तूर, मूग, बाजरी यांसह विविध खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान व पाण्याअभावी जळू लागले आहे. त्यामुळे शासन स्तरावरून नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासन नियमानुसार हेक्‍टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून नुकसानभरपाई व आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांव्दारे पालकमंत्री, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे विनंती केली आहे.

खरीप हंगामाच्या सुरुला काही प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांची उगवण चांगली झाली होती. मात्र त्यानंतर आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून विहीर, बोअरवेल कोरडे पडलेले असल्याने अनेक भागांतील पिके पाण्या वाचून सुकून व करपून जाऊ लागली आहेत. पिकांची वाढ खुंटल्याने, आणि काही प्रमाणात मवा, करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया गेलेला आहे. याचा परिणाम उत्पादनावर आणि शेती मशागत खर्चावर होण्याची शक्यता असल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. पिके वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या माध्यमातून पाळी देण्याचा प्रयत्न केला. मात्र विहिरी व अन्य जलस्रोतांची पाणीपातळी खोल गेल्याने अनेकांना पिकांना पाणी देणे शक्य झाले नाही. परिणामी काही शेतकऱ्यांवर उभी पिके मोडून टाकण्याची वेळ आली आहे.

पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, औषध फवारणी व मजुरी यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन हातातून जाण्याबरोबरच शेतीसाठी घेतलेले कर्ज, उसनवारी आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष शेतशिवारात प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानग्रस्त खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. पंचनाम्यांमध्ये नुकसानीची योग्य नोंद करून पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई व आवश्यक आर्थिक मदत मिळवून द्यावी. तसेच संबंधित शेतकऱ्यांना पीकविमा व शासनाच्या इतर उपलब्ध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली आहे.

या मागणीचे लेखी निवेदन शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार विजय लोकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, पालकमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

या निवेदनावर पोथरे ग्रामपंचायत सदस्य रघुवीर जाधव, माजी सरपंच हरिश्चंद्र झिंजाडे, भाजपचे सो.मिडीया.ता. अध्यक्ष नितीन झिंजाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, संदीप नंदरगे, संतोष साळुंखे, दयानंद रोही, दिगंबर झिंजाडे, नाना शिंदे, बापूराव गोसावी, दत्तात्रय आढाव, सुभाष शिंदे, नामदेव शिंदे, दत्ता हिरडे, संजय शिंदे, बाळासाहेब खराडे, हरिभाऊ हिरडे, विवेक कुलकर्णी, ऋषींकेश रणवरे, महादेव शिंदे, शांतीलाल जाधव, सागर झिंजाडे आदींसह पोथरे ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *