
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश पोहोचविणे हा या पदयात्रेचा प्रमुख उद्देश होता.या पदयात्रेत महाविद्यालयातील विद्यार्थी, NSS स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात राष्ट्रध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसरातून पदयात्रा काढली.

यावेळी राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम आणि राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना जपण्याचे आवाहन करण्यात आले.‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. पदयात्रेला विद्यार्थी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यु माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुधीर मुळीक यांनी नियोजन केले. तसेच सदरील पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी NSS स्वयंसेवक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.