
करमाळा प्रतिनिधी
दि. 10/08/2026 रोजी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठान शंकरनगर धवलनगर,अकलूज संचलित प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा येथील नवरस सांस्कृतिक क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान’ आणि ‘नशामुक्त अभियान’ या विषयांवर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांतून समाजप्रबोधनाचा प्रभावी संदेश दिला.

उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वेदपाठक मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम पार पडला. स्पर्धेतील सर्व रांगोळ्यांचे परीक्षण परिसेविका विद्या ढाकणे व समुपदेशक कपिल भालेराव यांनी केले.
स्पर्धकांनी ‘एक अवयवदाता आठ जणांचे प्राण वाचवू शकतो’, ‘अवयवदान करा, जीवनदान द्या’, तसेच ‘नशामुक्त भारत’ यांसारख्या समर्पक संदेशांची अत्यंत आकर्षक व सुबक रांगोळ्या साकारल्या. हृदय, मूत्रपिंड, फुप्फुस, नेत्र यांसारख्या अवयवांच्या रेखाटनातून अवयवदानाचे महत्त्व, तर भारताच्या नकाशासह व्यसनमुक्तीचा संदेश देत नशामुक्तीचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांक रुतुजा विद्वत, द्वितीय क्रमांक शिवांजली कुदळे, तृतीय क्रमांक तेजस्विनी खोटे, तर उत्तेजनार्थ पारितोषिके समीक्षा बोकन व राजनंदिनी भोगल यांना प्रदान करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रोत्साहनाने ही स्पर्धा यशस्वी झाली. कार्यक्रमाचे संयोजन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. जाधव व नवरस क्लबचे प्रा. एस. पी. नाईकनवरे यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.