करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यात यावर्षी मान्सून दगड धोंड्या सारखे बरसत तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ज्या पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहतो त्या पावसाने आज तालुक्यात हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे शेतातील उभ्या पिकासह शेतजमीन देखील वाहून गेली आहे. तूर, मका, कांदा, उडीद, बाजरी, केळी, ऊस, भाजीपाला या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आयुष्यभराचे कष्ट, घेतलेले कर्ज, खरेदी केलेले बी-बियाणे, औषधे, खतांचा खर्च सगळं एका क्षणात पाण्यात गेले आहे.

पावसामुळे नुकसान झालेले यांचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले. घोषणांचा पाऊस पडतोय पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात एक पैसाही जमा होत नाही. राज्य सरकारने घोषणांच्या आणि शब्दांच्या पलीकडे जाऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे. करमाळ्या तालुक्यात दिवासाड मंत्री दौरे करत आहेत. निमित्त अतिवृष्टी पाहणी दौरा उद्देश मात्र येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे मेळावे, बैठका, पक्षाची पाटी लावून उद्घाटने, विरोधी पक्षातील आमदाराला आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न, पक्ष वाढवणे, अतिवृष्टीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळणे मात्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दौऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आस्थेने आपुलकीने चौकशी करून सीना नदीवरील पूल मंजूर करण्याची घोषणा केली गेली व त्याचे इस्टिमेट पाठवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक झोपली नसून शेतकरी सुद्धा पूर्णपणे झोपला आहे व उध्वस्त झाला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *