
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील उजनी धरण पट्ट्यातील गावांमध्ये शेतीपंपांसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. ऊस, डाळिंब, केळी, चारा तसेच इतर नगदी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी आज सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उजनी धरण पट्ट्यातील गावांना किमान आठ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महावितरणकडून होत असलेल्या अपुऱ्या व अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने उत्पादन धोक्यात आले असून जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आठ तास वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली.

यावेळी गणेश चिवटे म्हणाले की “उजनी धरण पट्ट्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ वीजेचा नसून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. या भागातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करत आहोत. उद्या मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे असेही गणेश चिवटे यांनी सांगितले.
यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ बापू झोळ, वाशिंबे गावचे उपसरपंच अमोल पवार, अमोल भोईटे आणि अजित झोळ उपस्थित होते.
