
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरावर पाणीटंचाईचं ऐतिहासिक संकट असून इतिहासात नोंद घेणे इतके वाईट दिवस सध्या करमाळाकर अनुभवत आहेत, तब्बल ८-८ दिवस पाणी येत नाही व आले तरी ते पूर्ण दाबाने मिळत नाही अशी दुरावस्था असून सत्ताधारी सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सपशेल अपयशी ठरल्याची टीका माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ यांनी केली. करमाळा शहराला सर्वप्रथम १९६७ साली नामदेवराव जगताप यांनी सीना नदीवरून पाणीपुरवठा योजना राबवली. त्यानंतर जयवंतराव जगताप यांनी १९९३ साली आमदार असताना खास बाब म्हणून उजनी धरणावरून पाणीपुरवठा योजना मंजूर केली.

तेव्हापासून करमाळा शहराला सुरळीत व अखंडित असा पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर शहराची लोकसंख्या वाढ व शहराचा वाढता विस्तार यामुळे माजी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार मी व अमोदशेठ संचेती नगराध्यक्ष असताना शहराची विस्तारित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. शहराच्या सर्व प्रभागाला सुरळीत पाणी पुरवठा होणेसाठी चारी दिशेला पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या व सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला व सुरू होता. मात्र २०२१ मध्ये बॉडीची मुदत संपल्यानंतर प्रशासकाच्या काळात शहराचे कामकाज विस्कळीत होऊन रस्त्याची व पाणीपुरवठ्याची दूर्दशा सुरू झाली.

त्यानंतर निवडणूक होऊन सत्तांतर झाले. परंतु तरीदेखिल गेल्या सात महिन्याचा अनुभव पाहता शहरात कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. उलट सर्वत्र धुळीचे साम्राज्य, रस्त्याची दुरावस्था आणि पाणीटंचाईने तर अक्षरशः नागरिक हैराण झालेले आहेत. तब्बल ८-८ दिवस पाणी येत नाही व आले तरी ते पूर्ण दाबाने मिळत नाही अशी परिस्थिती सध्या करमाळावासि अनुभवत आहेत असे मत माजी नगराध्यक्ष दिपक ओहोळ यांनी मांडले. माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा प्रशासनावर, पदाधिकाऱ्यांवर प्रचंड असा वचक व आदरयुक्त दरारा असल्यामुळे शहर विकासाच्या कामकाजात हलगर्जीपणा कधीही अनुभवास मिळाला नाही व आज सत्तेत असलेले बहुतांश काळ जगताप यांच्या नेतृत्वाखालील सत्तेचे लाभार्थीच होते याचा विसर पडू नये असे देखील यावेळी ओहोळ यांनी नमूद केले.