करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांवर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वीज कपातीचे संकट ओढावल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या पाश्र्वभूमीवर टाकळी (ता. करमाळा) येथे धरणग्रस्त शेतक-यांची विचारविनिमय बैठक पार पडली. बैठकीत शासनाने वीजपुरवठा कमी करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा धरणग्रस्त शेतकरी तीव्र जनआंदोलन उभारतील, असा इशारा बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिला. बैठकीत बोलताना गुळवे म्हणाले की, उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाला की. सर्वप्रथम धरणासाठी त्याग केलेल्या गावांतील शेतकऱ्यांनाच अन्याय सहन करावा लागतो. पाण्याअभावी उभी पिके डोळ्यादेखत जळून जातात, मात्र प्रशासनाकडून कोणताही दिलासा मिळत नाही. करमाळा तालुक्याच्या शेजारील भागात सहा तास वीजपुरवठा सुरू असताना, केवळ करमाळा तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांवरच वीज कपातीची कुऱ्हाड चालविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, शासनाचा हा निर्णय धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून तो तातडीने रद्द करण्यात यावा. अन्यथा हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील. गुळवे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनकाळाचा उल्लेख करत सांगितले की, त्यावेळी उजनी धरणाचा पाणीसाठा उणे ४० टक्कयांपर्यंत गेला होता, तरीही योग्य नियोजन करून धरणग्रस्त भागाला सहा तास वीजपुरवठा करण्यात आला होता.सध्या धरणाचा पाणीसाठा उणे 27% असतानाही वीजपुरवठा कमी करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शासन निर्णय जर मागे घेतला गेला नाही तर पुढील काळामध्ये जे आंदोलन उभे करण्यात येईल. त्या आंदोलनाला कोणत्याही राजकीय, सामाजिक, गटा-तटाचे नेतृत्व नसणार आहे. सदरचा लढा सर्वसामान्य धरणग्रस्त शेतकऱ्यांचा असणार आहे. अशाप्रकारची देखील आठवण गुळवे यांनी यावेळी करुन दिली. बैठकीनंतर उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले, पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, माजी पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे, माजी सरपंच मनोहर हंडाळ, सरपंच शरद भोसले, सचिन वेळेकर, पांडुरंग नवले, अविनाश मोरे, सुग्रीव दोडमिसे, माजी सरपंच सुनीलकुमार तानवडे, डॉ. गोरख गुळवे, सामाजिक कार्यकर्ते देविदास साळुंखे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच आणि मोठ्या संख्येने धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *