दहिगाव योजनेचे पाईप दुसऱ्यांदा जाळले. मोकाट आरोपी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक.

करमाळा प्रतिनिधी

      गेल्या पाच सहा महिन्यांमध्ये करमाळा तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक असून करमाळा तालुक्याचा बिहार बनू पाहत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील २४ गावांची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या ४ महिन्यापासून बंद पाडले गेले आहे. हे कमी म्हणून की काय उजवी लघवीतरीका क्र.६ वरील बंदनलिका वितरण प्रणालीसाठी आणलेले २८ लाखांचे पाईप आतापर्यंत जाळण्यात आले आहेत. यासंबंधी करमाळा पोलीस स्टेशनला २ वेळेस एफ आय आर ही दाखल  केलेला आहे.परंतु अद्यापही आरोपी मोकाटच आहेत. प्रशासनाच्या या कुचकामी धोरण विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून येत्या १६ मे रोजी अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष अध्यक्ष भरत अवताडे यांनी दिला आहे.
   यावेळी बोलताना अवताडे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाचे मंत्री मा.हसन मुश्रीफ साहेब हे गोकुळ दूध संघाने सुरू केलेल्या सौर प्लांट च्या उद्घाटनासाठी करमाळ्यात आले होते त्यावेळेस त्यांनी करमाळ्याचा बीड होऊन देऊ नका असे सूचक विधान व्यासपीठावरील उपस्थित आमदार नारायण पाटील यांना उद्देशून केले होते. गोकुळच्या सौर प्लांट च्या कामातही अनेक अडथळे आणले गेल्यामुळे उद्विग्न झालेल्या मंत्री महोदयांनी आमदारांना तो इशारा दिला होता, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये काहीही बदल झालेला नाही‌. यापूर्वी दहिगाव योजनेचे १४ फेब्रुवारी रोजी १५ लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आले होते. काल परत ८ मे रोजी १३ लाख रुपये किमतीचे पाईप जाळण्यात आलेले आहेत. लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने करमाळ्याचा बिहार बनवण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून सुरू आहे, परंतु तो आम्ही हाणून पाडणार असून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावरती हा प्रकार घातलेला असून करमाळ्याचा बिहार होऊन देणार  नाही. त्यासाठी १६ मे रोजी अर्जुन नगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ता.अध्यक्ष भरत अवताडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी ता.अध्यक्ष हनुमंत मांडरे-पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस अंजिक्य पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष आशपाक जमादार,देवळालीचे माजी सरपंच अशिष गायकवाड,वाघाचीवाडीचे माजी सरपंच देवीदास वाघ,देवळालीचे सरपंच पोपट मोरे,सतिश पवार,संतोष नेटके आदी उपस्थित होते.

    संबंधित निवेदनाच्या प्रती त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, करमाळा तहसीलदार ,करमाळा पोलीस स्टेशन यांना दिलेल्या आहेत.

दोन वेळेस काम बंद पाडले, दोन वेळेस पाईप जाळले हे आता खूप झाले. आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये दहिगाव योजनेमुळे क्रांतिकारक बदल होऊ लागलेला असताना विध्वंस प्रवृत्तीची मंडळी सत्ताधारी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने हे विघातक कृत्य करत असून त्याचा आम्ही जाहीर निषेध म्हणून व दहिगाव योजनेचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी रास्ता रोको करत आहोत.
आशिष गायकवाड
मा. सरपंच देवळाली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *