ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ
लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा
करमाळा, दि. ४ : भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी संवाद साधण्याचे सामर्थ्य देणारे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचा आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांची वक्तृत्व व संवादकौशल्ये विकसित व्हावीत, या उद्देशाने करमाळा येथे जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा–२०२६ आयोजित करण्यात आली आहे.
यशकल्याणी सेवाभावी संस्था, करमाळा, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर आणि सोलापूर इंग्लिश लॅंग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा बुधवार, दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता यशकल्याणी सेवाभवन, करमाळा येथे होणार आहे. यशकल्याणी संस्थेच्या थोर देणगीदार व संस्थापिका लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके आणि सोलापूर शहरातून तालुकास्तरावर निवड झालेले गुणवंत विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त मा. भरतराव शिंदे-पाटील राहणार आहेत. प्रोलक्स वेलनेस अँड ग्लॅमोवेल प्रा. लि., पुणेच्या संचालिका डॉ. प्रचिती पुंडे आणि यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. गणेश करे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शहीद अमोल निलंगे प्रतिष्ठानचे अरविंद निलंगे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे शिक्षण उपसंचालक इब्राहिम नदाफ, सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्रा. रामदास टोणे, करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, DELTAS चे जिल्हा समन्वयक प्रा. गुरुनाथ मुचांडे आणि ब्रिटिश कौन्सिल इंडियाचे मार्गदर्शक प्रा. अशपाक काझी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोलापूर जिल्हा इंग्लिश लॅंग्वेज टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लवंड, सचिव धनाजी राऊत, उपाध्यक्ष आबासाहेब दाढे, शशिकांत चांदणशिवे व आगतराव भोसले, करमाळा तालुका संघटनेचे अध्यक्ष कल्याणराव साळुंखे, सचिव गोपाळराव टाकीक, उपाध्यक्ष शरद शिंदे, प्रसिद्धीप्रमुख सुखदेव गिलबिले, अतिरिक्त सचिव मारुती जाधव, प्रा. जयेश पवार, प्रा. विष्णू शिंदे, तसेच जिल्ह्यातील विविध तालुका संघटनांचे अध्यक्ष, सचिव आणि शिक्षक या वेळी उपस्थित राहणार आहेत.
तालुकास्तरावर यश मिळवून जिल्हास्तरावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा केवळ पारितोषिक मिळवण्याची संधी नाही; तर स्वतःचे विचार निर्भयपणे मांडण्याचा, सभाधीटपणा विकसित करण्याचा आणि भाषिक न्यूनगंडावर मात करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. इंग्रजीचे ज्ञान असणे आणि इंग्रजीतून प्रभावीपणे विचार मांडता येणे, या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. शिक्षणव्यवस्थेने दुसऱ्या कौशल्याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता अशा स्पर्धा अधोरेखित करतात.
आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान पुरेसे ठरणार नाही. संवादकौशल्य, आत्मविश्वास, चिकित्सक विचार आणि सार्वजनिक अभिव्यक्ती यांचीही तितकीच आवश्यकता आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी वक्तृत्वाचे व्यापक व्यासपीठ देणारा हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि अनुकरणीय ठरणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी यशकल्याणी सेवाभावी संस्था, शिक्षण विभाग, जिल्हा व तालुका इंग्लिश लॅंग्वेज टीचर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि शिक्षक परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी नागरिक, शिक्षक आणि पालकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *