शासन निर्णय स्पष्ट असताना दिशाभूल; दिग्विजय बागल यांच्या नियुक्तीवर आक्षेप बिनबुडाचे

१४ मेच्या बैठकीचा दाखला देत १५ जुलैच्या शासन निर्णयाकडे दुर्लक्ष; सुनील तळेकर यांनी जनतेची दिशाभूल थांबवावी – सचिन पिसाळ

प्रतिनिधी

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत भाजप नेते दिग्विजय बागल यांच्या सह-अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केलेले आरोप वस्तुस्थितीविरुद्ध असून जनतेची दिशाभूल करणारे आहेत, असा आरोप भाजपचे करमाळा ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन पिसाळ यांनी केला.

“अभ्यासू नेतृत्वाची समिती सह-अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने आता पाटील गटाच्या नेत्यांनाही बैठकीसाठी पूर्ण अभ्यास करून जावे लागणार आहे. त्यामुळेच सुनील तळेकर अस्वस्थ झाले असावेत. त्या समितीत प्रवक्ते म्हणून नव्हे, तर स्वतःचा अभ्यास, मांडणी आणि निर्णयक्षमतेच्या जोरावर भूमिका मांडावी लागते,” असा टोला पिसाळ यांनी लगावला.

पिसाळ म्हणाले, तळेकर यांनी १४ मे २०२६ रोजीच्या समितीच्या पत्राचा आधार घेत नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, १५ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार करमाळ्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांसाठी सह-अध्यक्षांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. दिग्विजय बागल यांची नियुक्तीही त्याच शासन निर्णयानुसार झाली असून ही बाब जाणीवपूर्वक लपविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

“आरोप-प्रत्यारोप करण्यात वेळ घालविण्यापेक्षा पाटील गटाने करमाळा तालुक्यातील रखडलेले पाणंद रस्ते पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्यातूनच शेतकऱ्यांना खरा दिलासा मिळेल,” असेही त्यांनी म्हटले.

दिग्विजय बागल यांची वाढती लोकप्रियता आणि जनसंपर्क पाहून पाटील गटात राजकीय अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यातूनच नैराश्याच्या भरात वस्तुस्थिती लपवून जनतेची दिशाभूल करणारी विधाने केली जात असल्याचा आरोपही पिसाळ यांनी केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *