
संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे करमाळ्यात उत्साहात स्वागत
करमाळा प्रतिनिधी
‘जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता’ पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाने तृप्त झालेले वारकरी आता आपल्या घराकडे परतू लागलेले आहेत. संतांच्या पालख्या पंढरपुरातून माघारी निघालेल्या आहेत. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची

पालखी पंढरपूरहुन त्रिंबकेश्वर ला जाण्यासाठी निघाली असून आज दुपारी करमाळ्यामध्ये या पालखीचे आगमन झाले. करमाळा शहरातील नागरिकांनी उत्साहामध्ये पालखीचे स्वागत केले. किल्ला विभागातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये ही पालखी

दुपारी विसावली. सुमारे दीडशे वर्षांपासून ही दिंडी आषाढी एकादशीनंतरच्या पंचमीला करमाळ्यातील विठ्ठल मंदिरामध्ये येत असते. विठ्ठल मंदिराचे मालक कै. बंडोपंत कुलकर्णी यांचे जावई प्रशांत जोशी यांनी श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांचे

पूजन केले. सुमारे 35 वर्षापासून प्रशांत जोशी श्री निवृत्तीनाथ महाराजांची सेवा करीत आहेत. त्यानंतर सर्व वारकऱ्यांना त्यांच्या वतीने दुपारचे भोजन देण्यात आले. शहरातील नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केलेली होती. दुपारी दोनच्या

दरम्यान पालखी पुढे जातेगाव मुक्कामी जाण्यासाठी मार्गस्थ झाली. शहरवासीयांनी जड अंत:करणाने पालखीला निरोप दिला.

