
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील केम गावाची ऐतिहासिक व पारंपरिक सांस्कृतिक परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जपली जात आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री उत्तरेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गेल्या सुमारे ५० वर्षांपासून विविध पारंपरिक सोंगे, ऐतिहासिक नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

या सोहळ्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई, भीम-रावण, छत्रपती संभाजी महाराज, इंग्रजकालीन प्रसंग, गोमीची डान्स गाडी यांसह विविध ऐतिहासिक व पारंपरिक पात्रांचे नृत्यरूपातून सादरीकरण केले जाते. मनोरंजनासोबतच या सादरीकरणातून शौर्य, इतिहास, सामाजिक संदेश आणि संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रयत्न केला जातो.
श्रावण सोमवारच्या दिवशी केम गावातील रस्त्यांवर पालखी सोहळा व विविध सोंगांच्या गाड्यांची आकर्षक मिरवणूक पाहण्यासाठी केवळ केमच नव्हे, तर परिसरातील अनेक गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे हा सोहळा केम गावाच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख बनला असून, त्याला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे.
केम गावाची ऐतिहासिक, धार्मिक आणि पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपण्याची ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम या सोहळ्याच्या माध्यमातून होत आहे. सुमारे पाच दशकांपासून अखंडपणे सुरू असलेला हा पालखी व सांस्कृतिक सोहळा केमच्या लोकपरंपरेचे वेगळेपण अधोरेखित करणारा ठरत आहे.
“परंपरा जपायची, इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आणि संस्कृतीचा वारसा अभिमानाने जपायचा” या भावनेतून केम ग्रामस्थ दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात.