
करमाळा प्रतिनिधी
कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे गुरुजी व पं. वि. दिं. पलुसकर गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १२ वा आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत महोत्सव व पुरस्कार सोहळा २०२६ उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन सोनियाताई जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत के एन बोळंगे गुरुजी व विष्णू दि. पलुस्कर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी बोलताना सोनियाताई जयकुमार गोरे म्हणाल्या, “गेली २९ वर्षे सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी गायन व वादनाचे शिक्षण घेत आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्याचे आणि समाजोपयोगी कार्य करण्याचे महत्त्वपूर्ण काम विद्यालय करीत आहे. संगीत कलेमुळे मनाला शांती आणि स्थिरता प्राप्त होते. अशा संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे आधार दिला पाहिजे. भविष्यात विद्यालयाला कोणतीही गरज भासल्यास आम्ही निश्चितच विद्यालयाच्या पाठीशी राहू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी यशकल्याणी संस्थेचे गणेश करे-पाटील, करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत तसेच ग्लॅमोवेल वेलनेस, पुणे यांच्या संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या कार्याचा आढावा घेऊन गौरव केला.
महोत्सवामध्ये सुरताल संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह विविध राज्यांतून तसेच देशाच्या विविध भागांतून आलेल्या कलाकारांनी गायन, वादन व नृत्यकलेचे बहारदार सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. संगीत, नृत्य आणि भारतीय कला-संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध कलाकारांचा यावेळी सूरताल पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.
डॉ. श्रद्धा जवंजाळ यांना संस्थेचा मानाचा ‘सुरताल संगीत रसिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच डॉ. सुनीता टिकारे, ज्योती दास, देबाश्री मुखर्जी, बिजिता गोस्वामी, तनमना चौधरी, मृदुस्मिता दत्ता, स्निग्धा टाईड आणि भाग्यश्री पेंधे या कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सर्व पुरस्कारार्थींना मानाची पैठणी साडी भेट देण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विलासराव घुमरे, प्राचार्य मिलिंद फंड, कन्हैयालाल देवी, श्रेणिक शेठ खाटेर, जि.प. सदस्या अश्विनीताई चिवटे, डॉ.हेमा शिराळ, सुनीता देवी, भारतभाऊ शिंदे-पाटील व संतोष शेठ शियाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब पिसे, भाजपचे लक्ष्मण केकान, महादेव अण्णा फंड, डॉ. महेंद्र नगरे, नगरसेविका स्वातीताई फंड, डॉ. स्वाती घाडगे, विष्णू शिंदे, कल्याणराव साळुंके, कल्याण फंड, बाळकृष्ण लावंड, अशोक बरडे, अक्रूर शिंदे, सतीश वीर, संतोष पोतदार, दिगंबर पवार, पाटील सर, पत्रकार दिनेश मडके, किरणकुमार नरारे, नवनाथ थोरात, किशोर नरारे, ज्योती मुथा तसेच विद्यार्थी, पालक व महिला संगीत रसिक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमला भवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब नरारे यांनी केले. सूत्रसंचालन संध्या थोरे, रेशमा जाधव व अर्चना सोनी यांनी केले, तर आभार साक्षी नरारे यांनी मानले.