
रिटेवाडी व केतुर उपसा सिंचन योजने संदर्भात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावा, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे मुख्य सचिवाला निर्देश
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील बहुचर्चित रिटेवाडी व केतुर उपसा सिंचन योजनेचा सकारात्मक अहवाल जलसंपदा विभागाने शासनाकडे सादर केला असून यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक लावा असे निर्देश राज्याचे मुख्य आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी निर्देश दिले आहेत.

कुकडी प्रकल्पातून करमाळा तालुक्याला येणारे पाणी २४९ किलोमीटर लांब अंतरावर असल्यामुळे येत नाही.
कुकडी प्रकल्पातील करमाळा तालुक्याचे हक्काचे पाणी उजनी धरणात सोडून त्यातून उपसा सिंचन द्वारे कुकडी लाभ क्षेत्रातील 24 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला होता.
आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे आदेश जलसंपदा विभागाचे सचिव श्वेता पाटील यांना दिला होता.

यावर श्वेता पाटील यांनी रिटेवाडी येथून एक हजार व्यासाच्या दोन पाईपलाईन मधून 200 हस्पवरच्या सहा मोटारीच्या माध्यमातून पाणी उपसा करून कुकडीच्या सर्व कॅनल मधून फिरवता येईल असा अहवाल दिला होता शिवाय याच पद्धतीने पोंदवडी येथील पाणी उचलून 1000 व्यासाचे एक पाईपलाईन मधून केतुर परिसरातील कुकडीच्या कालव्यामधून शेतकऱ्यांना उपसा सिंचन द्वारे पाणी देता येईल असा अहवाल दिला होता.
दोन्ही ठिकाणच्या पंप हाउस साठी 65 हेक्टर क्षेत्र संपादित करावे लागेल असे अहवालात म्हटले आहे.

कुकडी प्रकल्पातील कालवे निर्माण करण्यासाठी करमाळा तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे बाराशे कोटी रुपये खर्च झाले आहेत मात्र या सर्व चॅनल मधून आता पाणी येत नाही.
यामुळे ज्या काळात उजनी ओव्हर फ्लो झाल्यामुळे पाणी सोडण्याचा प्रसंग येतो अशावेळी उपसा सिंचनमार्फत करमाळा तालुक्यातील सर्व सुविधा हेक्टर क्षेत्राला पाणी व या भागातील सर्व तलाव पाण्याने भरून घेता येतील असं अहवालात म्हटले आहे.

ही उपसा सिंचन योजनेचे प्रश्न मार्गी लागला तर मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी येऊन या तलावावर अवलंबून असलेली एमआयडीसी कार्यरत होऊन हजारो तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल शिवाय या तलावावर आधारित 23 गावांच्या पाणीपुरवठा योजना सुरू होणार आहेत. हा सर्व भाग पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मुक्त भाग म्हणून ओळखला जाईल.
गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात 38 वेळा उजनी धरणातून पाणी जास्त झाल्यामुळे खाली सोडावे लागले आहे या उलट कुकडी प्रकल्पातील पाचही धरण सरासरी 75% पेक्षा जास्त भरलेले नाहीत. कुकडीचे पाणी हे करमाळा तालुक्याला दिवा स्वप्न ठरत आहे. यामुळे केतुर व रीटेवाडी उपसा सिंचन योजना सुरू करणे गरजेचे आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिनाथ कारखान्याच्या मुळी टाकण्याच्या कार्यक्रमात जाहीर भाषणातून रिटेवाडी योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.
आज या प्रश्न शिवसेनेचे प्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख विलास गायकवाड, उपशहर प्रमुख नागेश गुरव, शहर प्रमुख संजय शीलवंत, वस्ताद अजिनाथ कोळेकर, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर यांच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी या प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक लावण्याची निर्देश राज्याच्या मुख्य सचिव यांना दिले आहेत.
बोलताना महेश चिवटे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडे आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात लवकरच बैठक होणार असून या बैठकीसाठी तालुक्यातील या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात येणार असून या बैठकीतून नक्कीच या प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास व्यक्त केला.