करमाळा प्रतिनिधी

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त करमाळा ते चोंडी नियमित बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी घारगावच्या माजी सरपंच लक्ष्मी संजय सरवदे यांनी केली आहे.

याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. गतवर्षी त्यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनीही अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करून त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवला.

चोंडी हे गाव करमाळ्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांना आणि भाविकांना चोंडी येथील जन्मभूमीचे दर्शन घेता यावे, हा बस सेवा सुरू करण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने समाजबांधव आणि नागरिक चोंडी येथे उपस्थित राहत असतात. मात्र नियमित वाहतुकीअभावी अनेकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने दखल घेऊन करमाळा ते चोंडी ही बस सेवा नियमित सुरू करावी, अशी मागणी लक्ष्मी संजय सरवदे यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *