

करमाळा प्रतिनिधी
भारतीय न्यायव्यवस्थेचे मानबिंदू, न्यायनिष्ठा, विद्वत्ता आणि संविधानिक मूल्यांचे खंदे पुरस्कर्ते, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा करमाळा वकील संघटनेच्या वतीने अत्यंत सन्मानपूर्वक व गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय लीगल कॉन्फरन्स या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्या दरम्यान करमाळा वकील संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व विधीज्ञांनी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना सन्मानित केले. यामध्ये करमाळा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. योगेश शिंपी, उपाध्यक्ष ॲड. राहुल सावंत, सचिव ॲड. सागर तळेकर तसेच ॲड. जगदीश चव्हाण, ॲड. मनोजकुमार कांबळे, ॲड. अंकिता वेदपाठक आणि ॲड. भाग्यश्री वाशिंबेकर यांनी आपल्या हस्ते हा मानाचा सत्कार केला.

या भव्य लीगल कॉन्फरन्ससाठी न्यायव्यवस्थेतील अनेक दिग्गज आणि नामांकित व्यक्तींची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई उपस्थित होते, तर पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. जे. जमादार, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद जाधव आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तथा ‘मॅट’ मुंबईचे व्हाईस चेअरमन विनय जोशी यांनी व्यासपीठ भूषवले होते.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. मिलिंद थोबडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गौरवपूर्ण सोहळ्याला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील असंख्य वकील आणि विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा वकील संघटनेने केलेल्या या आदरतिथ्या बद्दल आणि सत्कार सोहळ्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातील कायदे क्षेत्रातून मोठे कौतुक व गौरव होत आहे.