
करमाळा प्रतिनिधी
आमदार नारायण आबा पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा आढावा घेऊन प्रत्यक्ष दहिगाव येथील उजनी जलपातळीची माहिती घेतली. आमदार नारायण आबा पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन चालू असुन उजनी धरणातुन भीमा नदीपात्र व विविध कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने याचा थेट परिणाम दहिगाव ऊपसा सिंचन योजनेच्या चालु आवर्तनावर होऊ लागला आहे. यामुळे आमदार नारायण आबा पाटील

यांनी कार्यतत्परता दाखवून तातडीने दहिगाव येथील पंप हाऊसला भेट दिली. तेथील सर्व इलेक्ट्रिक पंपाची पाहणी करुन पाणी डिस्चार्ज बद्दल अधिकाऱ्यांकडुन सखोल माहिती घेतली. तसेच ज्या ठिकाणाहुन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी उचलले जाते त्या उजनी जलाशयातील बाथ कडे जाऊन तेथील पाणी पातळी जाणुन घेतली. याबद्दल बोलताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, सध्या भीमा नदी पात्रात पाणी विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने अडचणी येत असल्या तरी यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आपण उचल पाणी पातळी मर्यादा पाच मीटरने आणखी खोल केली जावी अशी मागणी

आपण अधिवेशनात केली आहे. जर या मागणीस यश आले तर उन्हाळ्यातही आणखी काही दिवस आवर्तन चालू राहण्यासाठी याचा उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले. सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाणी पातळीवर साडे सात फुट पाणी उपलब्ध असले तरी नदीपात्रात पाणी सोडल्याने दररोज किमान एक फुट पाणी पातळी कमी होत आहे. यामुळे अजुन सात ते आठ दिवस इलेक्ट्रिक पंप व वीज पुरवठा याची साथ मिळाल्यास व तांत्रिक बिघाड नाही झाल्यास आवर्तन चालू राहील अशी माहिती शाखा अभियंता सौदणे यांनी दिली. तसेच सध्याचे आवर्तन हे तब्बल एकशे दहा दिवस चालले असल्याचेही सौदणे यांनी सांगितले. यावेळी पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता देवकाते, पंचायत समिती माजी उपसभापती गणेश चौधरी, कोंढेजचे माजी सरपंच निलेश राऊत, ठेकेदार राजेंद्र पोळ तसेच पंप हाऊस यांत्रिक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
