करमाळा प्रतिनिधी

उजनी जलाशय काठावरील शेतीपंपांच्या वीज कपातीविरुद्ध आरपारची लढाई लढण्यासाठी भिमानगर येथील उजनी धरण व्यवस्थापन कार्यालयाला घेरणाऱ्या ‘उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर प्रशासनाला झुकावे लागले आहे. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचित्रा डुंबरे यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेत, वीज पुरवठा पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक कायदेशीर पावले उचलण्याचे लिखित आश्वासन दिले. या ठोस आश्वासनानंतर संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव बंडगर व सहकाऱ्यांनी आपले नियोजित आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

धरणात ४३.११ टक्के (२३.१० टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना केवळ २ तास वीज देण्याच्या जुलमी धोरणाविरोधात ‘प्रशासकीय अनास्थेचे वाभाडे काढले होते. ९ जुलैची डेडलाईन संपताच करमाळा तालुक्यातील शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी भिमानगर येथील कार्यालयाकडे कूच केली होती. परिस्थिती चिघळणार आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार हे लक्षात येताच, उप-कार्यकारी अभियंता ना. बी. खडतरे यांनी वरिष्ठ पातळीवर पाठवलेल्या पत्राचा दाखला देत, कार्यकारी अभियंता सुचित्रा डुंबरे यांनी स्वतः या प्रकरणात मध्यस्थी केली.

बिगर सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सुरक्षित ठेवून, धरणातील पाणीपातळी आता समाधानकारक (८६.७६ टीएमसी एकूण साठा) वाढली असल्याने शेतकऱ्यांची मागणी रास्त असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वीच्या आदेशांमध्ये सुधारणा करून, महावितरण कंपनीमार्फत शेतीपंपांचा वीज पुरवठा दररोज २ तासांवरून वाढवून तो पूर्ववत ८ ते १० तास सुरळीत करण्याबाबत वरिष्ठ पातळीवरून तात्काळ आदेश काढले जातील, असे लेखी आश्वासन सुचित्रा डुंबरे यांनी समितीला दिले.

उपोषण स्थगितीची घोषणा करताना संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बंडगर म्हणाले की, “हा उजनीसाठी त्याग करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आवाजाचा विजय आहे. कार्यकारी अभियंता सुचित्रा डुंबरे यांनी दिलेल्या लेखी शब्दाचा मान राखून आम्ही तूर्तास उपोषण स्थगित करत आहोत. मात्र, जर महावितरणने पुढील ४८ तासांत वीज पुरवठा पूर्ववत केला नाही, तर शेतकरी पुन्हा एकही पूर्वसूचना न देता भीमानगर कार्यालयाला टाळे ठोकतील. प्रशासनाने आम्हाला गाफील समजू नये.”

प्रशासनाने नमते घेत लेखी पत्र सुपूर्द केल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी एकत्र जल्लोष केला. यावेळी धरणग्रस्त संघर्ष समितीचे उपाध्यक्ष भारत साळुंखे, आदिनाथचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील, नवनाथ शिंदे, विजय नवले, रंगनाथ शिंदे, अखलाक जहागीरदार, संपत सरडे, दिलावर मुलानी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *