करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी करमाळा शहर मंडलाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत दोन दिवसीय भव्य प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडले. श्री कमलादेवी कन्या प्रशाला, करमाळा येथे पार पडलेल्या या शिबिराला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

या प्रशिक्षण शिबिरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यपद्धती, बूथ व्यवस्थापन, शक्ती केंद्रांची मजबुती, सोशल मीडियाचा प्रभावी वापर तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. करमाळा शहर मंडलातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिबिराच्या पहिल्या दिवशी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडल अध्यक्ष काकासाहेब सरडे यांनी प्रास्ताविक करत शिबिराच्या उद्देशाचे विवेचन केले. प्रा. रामदास झोळ सर, जेष्ठ नेते संजय घोरपडे व भगवानगिरी गोसावी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाची विचारधारा, समर्पणभाव आणि संघटनशक्तीचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी कार्यकर्त्यांना तळागाळात जाऊन प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.

दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर मार्गदर्शनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले. नितीन झिंजाडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षविचार प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे तंत्र स्पष्ट केले. भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी बूथ विस्तार, संघटन बळकटीकरण आणि निवडणूकपूर्व तयारी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जेष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, राज्य कार्यकारिणी सदस्य राजकुमार नाना पाटील आणि जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे यांनी आगामी राजकीय परिस्थिती, निवडणुका आणि पक्षाच्या धोरणांबाबत कार्यकर्त्यांना दिशा दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी मानले.

या शिबिरामुळे करमाळा शहरातील भाजपा संघटनेला नवी दिशा व ऊर्जा मिळाली असून आगामी काळात पक्ष अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास गणेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *