संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा जागर; बाल वारकऱ्यांपासून दिग्गजांचा सन्मान

करमाळा प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत असून, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पुणे महसूल विभागातील सर्व जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एकाच वेळी ‘ज्ञान माऊली’ या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करमाळा येथील गुरु गणेश सभागृहात हा कार्यक्रम भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, वारकरी संप्रदायाची शिकवण, अभंग, संगीत आणि संवादाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ज्ञान माऊली’ या उपक्रमाची संकल्पना राबविण्यात आली. आधुनिक काळातील तरुण पिढीला संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आणि वारकरी संप्रदायाची मूल्ये सहज, सोप्या व प्रभावी पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना गणेश चिवटे यांनी सांगितले की, आजच्या पिढीसाठी वारकरी संप्रदायाचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. संतांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविताना वारकरी संप्रदायाची परंपरा व चौकट कायम ठेवून ते साध्या, सरळ आणि संगीताच्या माध्यमातून तरुणांना रुचतील अशा पद्धतीने मांडण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत असल्याबद्दल गणेश चिवटे यांनी सांस्कृतिक कार्य विभागाचे आणि मंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक चौकटीत न ठेवता ते समाजजीवन, संस्कार आणि युवा पिढीच्या विचारविश्वाशी जोडण्याचे काम अशा सांस्कृतिक उपक्रमातून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘ज्ञान माऊली’ कार्यक्रमामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा संगीत, अभंग, संवाद व निरूपणाच्या माध्यमातून जागर करण्यात आला. त्यामुळे उपस्थित भाविक, वारकरी आणि नागरिकांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांची अनुभूती मिळाली. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी वासकर संस्थेचे गुरुवर्य विठ्ठल महाराज पाटील, वारकरी तालुका संघाचे प्रदीप ढेरे, संतोष बनासे, लखन पवार तसेच ह.भ.प. विलास महाराज जाधव यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.

या सांस्कृतिक उपक्रमात सहभागी झालेल्या लहान मुलांपासून ते वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व दिग्गज मान्यवरांपर्यंत सर्वांचा गणेश चिवटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संत परंपरेशी जोडलेल्या नव्या पिढीतील बाल वारकऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच वारकरी संप्रदायाच्या प्रसारासाठी आणि संतविचारांच्या जागरासाठी कार्य करणाऱ्या ज्येष्ठांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष हा केवळ उत्सव न राहता त्यांच्या विचारांचा आणि समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम ठरावे, या उद्देशाने ‘ज्ञान माऊली’ हा उपक्रम राबविण्यात आला. करमाळ्यातील कार्यक्रमामुळे गुरु गणेश सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *