
करमाळा प्रतीनिधी
उजनी जलाशयातील प्रस्तावित मच्छीमारी ठेका प्रणाली कायमस्वरूपी रद्द करून स्थानिक मच्छीमार व संबंधित घटकांच्या रोजगाराचे संरक्षण करावे, या प्रमुख मागणीसाठी लोकशासन आंदोलन प्रणित उजनी मच्छीमार बचाव अभियानाच्या वतीने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

उजनी जलाशयावर मच्छीमारीचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांसह धरणग्रस्त, पारधी समाज, आडतदार, हॉटेल चालक, मासे विक्रेते, जाळी विक्रेते, बोट मालक व चालक आदी अनेक घटकांचा रोजगार या व्यवसायावर अवलंबून आहे. मच्छीमारीचा ठेका दिल्यास या सर्व घटकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या रोजगार व उदरनिर्वाहाचा विचार करून मच्छीमारी ठेका पद्धती रद्द करावी, स्थानिक मच्छीमारांच्या पारंपरिक व्यवसायाचे संरक्षण करावे आणि संबंधित घटकांच्या रोजगाराची हमी द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
उपोषणास दिपाली डिरे, पूनम डिरे, पूजा कणीचे, पूजा पत्तुले, आशा पत्तुले, अंजना कणीचे, वनिता कणीचे, मंगल नगरे, केसरबाई नगरे, मंगल डिरे, पदमेश नगरे, दत्तात्रेय कणीचे, अमोल चंबरे, हनुमंत नगरे, रमेश पत्तुले, किरण कणीचे, अजिनाथ कणीचे, सतीश मुंगसे, संतोष कणीचे, गणेश पत्तुले, दादा नगरे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
यावेळी सरपंच सचिन विठ्ठल वेळेकर व ग्रामपंचायत अधिकारी गणेश पवळ यांनी उपोषणकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. स्थानिक मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.