करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे डॉ. कैसरजहाँ लिखित ‘अब्बा बरोबर आहेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विजयश्री सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठचे सहाय्यक कुलसचिव व प्रसिद्ध कवी शिवाजी शिंदे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आजच्या बदलत्या सामाजिक रचनेत आई-वडील आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. पुढील पिढी संस्कारशील घडण्यासाठी कुटुंबव्यवस्था भक्कम असणे आवश्यक आहे. ‘अब्बा बरोबर आहेत’ या पुस्तकातून वडिलांच्या भूमिकेचे अत्यंत प्रभावी चित्रण झाले असून मराठी साहित्यात या पुस्तकामुळे मोलाची भर पडली आहे.”

पुस्तकाच्या लेखिका डॉ. कैसरजहाँ यांनी आपल्या मनोगतातून वडिलांची महती सांगताना स्वतःचा जीवनपट उलगडला. एका सामान्य शिक्षकाने आपल्या कुटुंबाला दिलेले संस्कार, मार्गदर्शन आणि मूल्यांची जपणूक यांचा प्रभावी उल्लेख त्यांनी केला. “प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. म्हणूनच आपण त्यांना ‘बापमाणूस’ म्हणतो,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी डॉ. कैसरजहाँ व त्यांच्या कुटुंबाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करत, “आमच्या महाविद्यालयात अशा दर्जेदार कलाकृतीचा प्रकाशन सोहळा पार पडणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सांगितले.

यावेळी सुप्रसिद्ध कवी तथा शब्दशिवार प्रकाशनचे प्रकाशक इंद्रजीत घुले, सुप्रसिद्ध लेखक डॉ. राजेंद्र दास यांचीही मनोगते झाली. उपस्थितांमध्ये कवी सुरेश शिंदे, संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत, अजयकुमार भोसले, सिमरन भोसले, डॉ. अश्विन अंबी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने, कनिष्ठ विभागाचे प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मुक्ता काटवटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिमरन भोसले यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *