
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण झालेल्या गंभीर व भयावह परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शब्द सैनिक सामाजिक प्रबोधन मंच यांच्या वतीने करमाळा नगर परिषद प्रशासनाला सविस्तर व कडक शब्दांत निवेदन देण्यात आले.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक व वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात फिरत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून नागरिकांच्या जीवितास थेट धोका निर्माण झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडी, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, सार्वजनिक व खासगी मालमत्तेची हानी होत असून अनेक वेळा जनावरे गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडत आहेत. या संपूर्ण परिस्थितीसाठी प्रशासनाची उदासीनता व निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा ठपका निवेदनातून ठेवण्यात आला.

निवेदनात विशेषतः नमूद करण्यात आले की, अनेक आजारी, जखमी व वयोवृद्ध जनावरे उपचाराअभावी रस्त्यावर तडफडत मरत आहेत. ही परिस्थिती केवळ अमानवी नसून प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण आहे.
ज्या राज्यात गोवंश संरक्षणाचा कडक कायदा अस्तित्वात आहे, त्याच राज्यातील करमाळा शहरात गोवंशाची अशी दयनीय अवस्था होणे ही अत्यंत लाजिरवाणी व संतापजनक बाब आहे, असे तीव्र शब्दांत नमूद करण्यात आले. गोवंश रक्षण केवळ कायद्याच्या कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवले गेले पाहिजे, अन्यथा अशा कायद्याचा अर्थच काय, असा थेट सवाल गोपाल वाघमारे यांनी प्रशासनाला केला.

शब्द सैनिक सामाजिक प्रबोधन मंचच्या वतीने नगर परिषद हद्दीतील उपलब्ध जागेत सुसज्ज व कायमस्वरूपी कोंडवाडा तातडीने उभारण्यात यावा व त्यासाठीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच मोकाट जनावरांवर थेट कारवाई करण्याआधी संबंधित मालकांना अधिकृत नोटीस देण्यात यावी, नोटीसनंतरही गुरे न बांधणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि त्यानंतर ती जनावरे कोंडवाड्यात आणून जप्त करण्यात यावीत, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.
यासोबतच शहरात विशेष मोहीम राबवून एकाच वेळी सर्व मोकाट जनावरे कोंडवाड्यात जमा करावीत, कोंडवाड्याच्या बांधकाम व व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, देखरेखीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करावी, तसेच जनावरांसाठी नियमित चारा, पाणी व वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा ठोस मागण्या निवेदनात करण्यात आल्या.
यावेळी विद्यमान नगरसेवक सचिन घोलप, नगरसेवक सचिन भाऊ गायकवाड, नगरसेवक रवी भाऊ जाधव, नगरसेवक सुनील बनसोडे, विकी कारंडे, संतोष कांबळे, यांच्यासह शब्द सैनिक सामाजिक प्रबोधन मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………………
“हा प्रश्न केवळ जनावरांचा नसून शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा व गोमातेच्या सेवेचा आहे. जर प्रशासनाने तातडीने ठोस व परिणामकारक कार्यवाही केली नाही, तर पुढील टप्प्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची असेल असे शब्द सैनिक प्रबोधन मंचचे अध्यक्ष गोपाल वाघमारे यांनी यावेळी बोलताना सांगितले.