
करमाळा प्रतिनिधी
NCERT चे राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण नुकतेच दिनांक 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान RIE भोपाळ येथे पार पडले. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एन.सी.ई.आर.टी.), नवी दिल्ली यांच्या वतीने नव्याने विकसित करण्यात आलेल्या पूर्वतयारीच्या (इयत्ता तिसरी ते पाचवी) स्तरासाठीच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित तज्ञ प्रशिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दिव दमण दादरा नगर हवेली, गोवा या पश्चिम भारतातीत राज्यातील पाठ्यपुस्तक मंडळातील सदस्यांचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील बाळासाहेब बोडखे – सोलापूर, प्रीती कंठके – नांदेड, भूमेश्वर कतरे – गोंदिया, ज्योतीराम माने-सातारा, दत्तात्रय पाटील -कोल्हापूर, जिवन जरे – पुणे, अजय पाटील- जळगाव, सुनील देसाई- सातारा, शेषनारायण निघोजकर- पुणे, मानसी भोसले- रायगड या शिक्षकांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या शाळांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिक्षकांनी आपले अनुभव सदर प्रशिक्षणात सादर केले. महाराष्ट्रातील शिक्षणपद्धतीचे सर्वांकडून विशेष कौतुक करण्यात आले.

प्रशिक्षणादराम्यान नव्या पाठ्यपुस्तकांची रचना, आशय मांडणी, मुल्यांकन पद्धती यावर भर देण्यात आला. या प्रशिक्षणात गणिती जादू, वीणा-हिंदी, आपले अद्भुत जग, संतूर-इंग्रजी, खेळ-योग या एन.सी.ई.आर.टी निर्मित पुस्तकांची ओळख करून देण्यात आली. गटचर्चा, सादरीकरणे, अनुभव कथन पद्धतीने घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात महाराष्ट्रातील या शिक्षकांनी केवळ श्रोते म्हणून नव्हे तर सक्रीय भूमिका बजावली. या प्रशिक्षणामुळे महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाची सखोल समज, अध्यापनातील नाविन्य आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धती आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली आहे. प्रशिक्षणातून प्राप्त अनुभव पाठ्यपुस्तकातून प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार या शिक्षकांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याकडे सदर प्रशिक्षणार्थीनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सदर कार्यशाळेचे आयोजन प्रा. संध्या सांघाई (कार्यक्रम सह-समन्वयक), प्रा. ए.के. राजपूत (कार्यक्रम समन्वयक), व डॉ. संदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.