
करमाळा प्रतिनिधी
उजनी धरणाच्या पाण्यावर दिवसेंदिवस वाढत जाणारा ताण लक्षात घेता करमाळा तालुक्यातील बिटरगाव (वां) येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भविष्यातील पाण्याची पळवापळवी रोखायची असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाण्याचे आरक्षण व नियोजन करणे अपरिहार्य असल्याचे सांगून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाणीवापर संस्थांची रचना व व कार्यपद्धती समजून सांगितली व स्वतःहून पुढाकार घेऊन जास्तीत जास्त पाणी वापर संस्था स्थापन करून उजनीच्या पाणी नियोजनात सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

उजनी धरणासाठी ८४.३४ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील १० उपसा सिंचन योजनांचा एकूण वापर २१.७७ टीएमसी इतका आहे. मात्र अद्याप काही योजना पूर्णपणे कार्यान्वित नसल्याने सध्या केवळ ७ ते ८ टीएमसी पाणी वापरले जाते. भविष्यात उर्वरित १३ ते १४ टीएमसीचा वापर सुरू झाल्यास धरणावरील ताण आणखी वाढणार आहे. याशिवाय पुणे ते दौंड या पाणलोट क्षेत्रात २ महानगरपालिका, १० नगरपालिका, १० औद्योगिक वसाहती व खाजगी उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात पाणी वापरत आहेत. पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाढत्या नागरी विस्तारामुळे अतिरिक्त ७ टीएमसी पाणी राखून ठेवण्याची मागणी होत आहे. तसेच डिसेंबर २०२५ पर्यंत मराठवाड्यासाठी ७ टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनीवरील ताण आणखी वाढणार आहे. बाष्पीभवन व गाळामुळे साठवण क्षमतेत घट. उजनी जलाशयाचे क्षेत्रफळ तब्बल ३५७ चौ.किमी एवढे असल्याने दरवर्षी बाष्पीभवनामुळे सुमारे १७ टीएमसी पाणी कमी होते. याशिवाय मेरी संस्थेच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार धरणात १५ टीएमसी गाळ साचल्याने साठवण क्षमतेत घट झाली आहे. ही वस्तुस्थिती आमदार मोहिते पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांपुढे मांडून धरणाचे पाणी टिकवायचे असेल तर सर्व गावांच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाणी नियोजन अपरिहार्य असल्याचे सांगितले.
या बैठकीस खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, शिवतेजसिंह मोहिते पाटील, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, सविताराजे भोसले, शहाजीराव देशमुख, अजित तळेकर, आदिनाथ सहकारी संस्थेचे व्हॉ. चेअरमन महेंद्र पाटील, पै. अतुल पाटील, डॉ. हरिदास केवारे, धुळभाऊ कोकरे, नवनाथ बापू, संतोष खाटमोडे, ॲड. राहुल सावंत, राजाभाऊ कदम, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, वसंत अंबारे, दत्ताबापु देशमुख, विजय नवले, रामेश्वर तळेकर, दादा पाटील, शेलगावचे सरपंच अमर ठोंबरे, प्रा. अर्जुन सरक, प्रा. चौधरी सर, दत्ताबापु साळुंखे, भारत साळुंखे, गोरख जगदाळे, हरिभाऊ गरड, शशिकांत नरुटे, तसेच आदिनाथ व मकाई संस्थेचे आजी-माजी संचालक, विविध गावचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उजनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता डुंबरे मॅडम, उपअभियंता जडे यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते.