करमाळा प्रतिनिधी
माजी आमदार जयवंतराव जगताप व नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांना शिवसेनेत का घेतले ? याचा राग मनात धरून दिग्विजय बागल यांनी खडकी येथे सुळ वस्तीवर दमबाजी केली व धमकी दिल्याची तक्रार जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आज पोलिसात दिली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मस्के यांच्याकडे दिला आहे.
पोलिसात दाखल तक्रारीत म्हटले आहे की, पालकमंत्री जयकुमार गोरे पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी खडकी येथे आले असताना जिल्हाप्रमुख चिवटे येथे गेले होते. यावेळी समोरून येऊन दिग्विजय बागल यांनी त्यांच्या एक फूट अंतरावर समोर थांबून स्वतःच्या हातातील घड्याळ काढून एका समर्थक कार्यकर्त्याकडे देऊन आज याच्याकडे बघूनच घेतो म्हणत दमबाजी केली. यावेळी भाजपचे रामा ढाणे हे महेश चिवटे यांच्या बाजूला उभा राहिल्यामुळे मोठा वादाचा प्रसंग टाळला गेला. रामा ढाणे समोर येताच दिग्विजय बागल मागे सरकले. मिशीवर ताव देणे, कॉलर ओढणे, हात जोडणे अशा कृती करून तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे असा प्रकार सुरू असल्याची तक्रार चिवटे यांनी पोलीस स्टेशनला दिली आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सातत्याने दिग्विजय बागल व जिल्हाप्रमुख चिवटे या दोघांमध्ये वाद निर्माण होत आहे. खडकी येथे चिवटे व बागल यांचा समोरासमोर होत असलेला प्रकार उपस्थित तालुक्यातील शेकडो पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी बघत होते.
याबाबत बोलताना चिवटे म्हणाले की, पक्ष संघटना वाढवण्यासाठी चांगली लोक पक्षात येत असतील तर त्यांना घेण्याच्या सूचना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार माजी आमदार शहाजी बापू पाटील व इतर जिल्ह्यातील मान्यवरांच्या समन्वयाने माजी आमदार जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश झाला असून येणाऱ्या सर्व निवडणुका धनुष्यबाणावर लढवणार असल्याची घोषणा जगताप यांनी केली आहे. याचा राग मनात धरून सातत्याने दिग्विजय बागल वाद घालण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी ही सर्व गोष्ट संयमाने घेत आहे यामुळेच मी त्या दिवशीचा प्रकार सहन करून आज पोलिसात तक्रार दिली आहे.
यापूर्वी असेच दिग्विजय बागल यांनी दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांना मारहाण केली होती. तो पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तसेच शशिकांत केकान, गणेश इवरे अशा कार्यकर्त्यांना मारहाण करून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे दिग्विजय बागल कोणालाही दमबाजी करण्याचा प्रयत्न करतो पण अशी दमबाजी मी खपवून घेणार नाही, वेळप्रसंगी जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे.