करमाळा प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांची गेली सहा ते सात वर्षापासून पगार थकलेले असून हे पगार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनसीडीसी मधून दहा कोटी रुपये मंजूर करून कारखान्याला दिले आहेत मात्र मकाईच्या सर्वेसर्वा रश्मी बागल कर्मचाऱ्यांना पगार न देता ही रक्कम स्वतः हडप करण्याचा प्रयत्न करीत असून तात्काळ पगारी न दिल्यास आपल्या पोरा बाळासह सासवड येथे जाऊन रश्मी बागलच्या घरा पुढे उपोषण करणार असल्याचा इशारा मकाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र साहेबराव देशमुख सह शंभर कर्मचाऱ्यांनी आज दिला आहे. यावेळी कर्मचारी संघटनेचे बिबीशन कन्हेरे, उत्तम साळुंखे, मालोजीराव जाधव, आजिनाथ निकत, सतीश झिंजाडे, रवींद्र वाळुंजकर, अमोल अवताडे, नाना इरकर, भाऊ मिरगळ, नाथा पवार, आदी कर्मचारी उपस्थित होते.
करमाळा विश्रामगृह येथे मकाई कारखान्याचे माजी चेअरमन आप्पासाहेब झांजुर्णे व माजी संचालक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे उपस्थितीत मकाई कामगारांची बैठक व पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी अनेक कामगारांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया तिखट शब्दात व्यक्त केल्या. आमच्या घामाचे पैसे न देणाऱ्यांना देव सुद्धा माफ करणार नाही असे सांगत आमच्या व्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकाव्यात व आपले अधिकारी पाठवून मकाई कारखान्याला दिलेल्या 140 कोटी रुपयांचे कशा पद्धतीने बेकायदेशीर वाटप केले याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना मकाईचे माजी चेअरमन आप्पासाहेब झांजुर्णे म्हणाले की, बागल नावाचा भ्रष्टाचाराचा बकासुर तालुक्यात पोहोचला असून आदिनाथ कारखाना देशोधडीला बागल कुटुंबानेच लावला आहे. मकाई कारखान्याची निर्मिती मी केली, मी उभारणी केली, सातत्याने तीन वर्ष राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार या कारखान्याला मी मिळून दिले पण माझ्याशी गद्दारी करून हा कारखाना बागलांनी ताब्यात घेतला. गेली दोन वर्षापासून कारखाना बंद आहे. कारखान्यातील दहा कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. आता कारखान्याला शासनाने 140 कोटी रुपयांची मदत केली असून यातील 10 कोटी रुपये केवळ कर्मचाऱ्यांना देण्याची आहेत. यापैकी फक्त 70 ते 80 लाख कर्मचाऱ्यांना देऊन जवळपास नऊ कोटी रुपये हडप करण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना कारखान्याचे माजी संचालक महेश चिवटे म्हणाले की, कारखाना यावर्षी सुद्धा सुरू होत नाही. आता या वार्षिक सर्वसाधारण सभेत अजून वाढीव 200 कोटी रुपये कर्ज मिळवण्यासाठी हा कारखाना पाच हजार प्रतिदिन मॅट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्याचा ठरवूया असे बैठकीत सांगून ही रक्कम हडप करण्याचा प्रयत्न आहे.
यामुळे आता मंजूर झालेल्या १४० कोटीतूनच कारखाना सुरू करावा. चांगला कारखाना सुरू झाल्यानंतर नवीन कर्ज घ्यावे. केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढू नये व या ठरावाला विरोध करणार असल्याचे सांगितले.
22 सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा ठेवली असून या सभेचा अजेंडा अजून एकही सभासदाला दिलेला नाही. गुपचूप मीटिंग घेण्याचा केविलवाणा प्रयत्न चेअरमन दिनेश भांडवलकर करत आहेत.
दिनेश भांडवलकर हे सध्या रामायण कथेतील वाल्याच्या भूमिकेत असून बागल कुटुंबाच्या स्वार्थासाठी गोरगरीब कर्मचाऱ्यांचा गळा कापत आहेत. कर्मचाऱ्यांचा तळतळाट तुम्हाला सन्मानाने जगू देणार नाही असा इशारा बिबीशन कन्हेरे यांनी दिला.