करमाळा प्रतिनिधी

तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समिती पुन्हा नव्याने सक्रिय झाली असून सोमवार दि.१५ रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याबाबत करमाळा तहसील कार्यालयात समितीने निवेदन दिले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात समितीने म्हटले आहे की, गेल्या लोकसभा निवडणुकीवर ४० गावांनी बहिष्कार जाहिर केला होता. त्यावेळी सर्वच राजकीय नेत्यांनी ही योजना निवडणूकीनंतर त्वरीत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. परंतु शासनाकडून काहीही कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाकडून जाणून बुजून विलंब केला जात असल्याने लाभार्थी गावातील ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची शासनाकडून फसवणूक झालेली आहे. त्यामुळे रिटेवाडी उपसा सिंचन योजनेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.१५/०९/२०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत समिती करमाळा तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करणार आहे.

या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास दि ०७/१०/२०२५ रोजीपासून पुणे येथील महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशाराही समितीने या निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन देतेवेळी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील ४० गावांचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

………………….

वारंवार पाठपुरावा करूनही समितीची केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात असल्याने आगामी निवडणुकांच्या तोंडावर समिती अधिक सक्रिय झाली असून रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीने आगामी आंदोलने अधिक तीव्रतेने करण्याच्या दृष्टीने शहरातील जीन मैदान येथील कै. नामदेवराव जगताप व्यापारी संकुलातील गाळा नं.६६ येथे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या आंदोलनांत सहभागी होण्यासाठी लाभक्षेत्रातील ग्रामस्थांनी अंकुश शिंदे (मो. ९३७३७२५५२४), मदन पाटील (मो.९४२०११७०३५) आणि सुभाष बलदोटा (मो.९७६३२२०८३२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रिटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *