
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचे विशेष कार्याधिकारी (OSD) पाटील यांनी दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी कोकरे आयलॅन्ड, कुगाव ता. करमाळा, जि. सोलापूर येथे दौरा करून अत्याधुनिक शेती प्रयोगांची पाहणी केली. यावेळी त्यांनी निर्यातक्षम दर्जाचे केळी प्लॉट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित ऊस प्लॉट प्रत्यक्ष पाहिले व शेतकऱ्यांचा अभिनव दृष्टिकोन पाहून समाधान व्यक्त केले.
निर्यातक्षम दर्जाचे केळी प्लॉटमध्ये तयार झालेली आरोग्यदायी रोपे लावण्यात आली आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारकता जास्त आणि उत्पादन एकसमान आहे. आधुनिक ड्रिप सिंचन, मल्चिंग, पीक संरक्षक जाळ्या, संतुलित खत व्यवस्थापन यांचा वापर करून आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन केले जात आहे. केळी काढणी झाल्यानंतर ग्रेडिंग, वॉशिंग, वॅक्सिंग व पॅकेजिंगची सोय येथे आहे. पाटील यांनी सांगितले की, “जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा करण्यासाठी अशा दर्जेदार उत्पादनांची गरज आहे. कुगावच्या शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून राज्यासाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.”

AI तंत्रज्ञानावर आधारित ऊस प्लॉट या ठिकाणी मृदा आर्द्रता मोजणारे सेन्सर, हवामान अंदाज यंत्रणा व स्मार्ट सिंचन प्रणाली बसविण्यात आली आहे. ड्रोनद्वारे पिकांचे नियमित सर्वेक्षण, रोग-कीड नियंत्रणासाठी लक्ष केंद्रीत फवारणी, तसेच पिकांची वाढ मोजण्यासाठी डिजिटल नकाशे (Crop Mapping) तयार केले जातात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पाण्याचे अचूक व्यवस्थापन, खतांची आवश्यकता, काढणीचा योग्य कालावधी याचा डेटा तयार होतो. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च २५-३०% ने कमी होतो, तर उत्पादन ३०-४०% ने वाढते.
या प्रयोगाबद्दल पाटील म्हणाले “भविष्यातील शेती ही डेटा व तंत्रज्ञानावर आधारित असेल. कोकरे आयलॅन्ड हे त्याचं जिवंत उदाहरण आहे.”
या दौऱ्यात महेश धुळाभाऊ कोकरे सहाय्यक कृषी अधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली. निर्यातक्षम केळी लागवडीतील वाण निवड, लागवड अंतर, अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी व निर्यात प्रक्रियेचे तांत्रिक मार्गदर्शन केले. ऊस प्लॉटमध्ये AI वापरून पाण्याची व खतांची Real-time Management System कशी चालते, याचे प्रात्यक्षिक दाखवले. स्थानिक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन “शेतकरी उत्पादक गट” मार्फत सामूहिक निर्यात घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न केला जात आहे.
पाटील यांनी त्यांच्या या कामाचे विशेष कौतुक करून त्यांना “कृषी क्षेत्रातील तरुण अधिकाऱ्यांचे प्रेरणादायी उदाहरण” असे संबोधले.
कोकरे आयलॅन्ड हे केवळ कृषी पर्यटनाचे केंद्र नसून, आता तंत्रज्ञानाधारित प्रगत शेतीचे प्रात्यक्षिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. शेतकरी, कृषी विद्यार्थी, संशोधक यांच्यासाठी हे एक लिव्हिंग लॅब (Living Laboratory) आहे. राज्य शासनाकडून अशा प्रयोगशील शेती प्रकल्पांना प्रशिक्षण, बाजारपेठ व तांत्रिक सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही दिली.
या भेटीमुळे कोकरे आयलॅन्ड परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. “निर्यातक्षम शेती” ही आता केवळ कल्पना न राहता वास्तव ठरत आहे. तंत्रज्ञानामुळे कमी खर्च, जास्त उत्पादन, आणि दर्जेदार उत्पादन या तिन्ही गोष्टी साध्य होत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो आहे. भविष्यात कुगाव येथील कोकरे आयलॅन्ड हे “प्रगत कृषीचे मॉडेल” म्हणून संपूर्ण राज्यात नावारूपाला येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.