करमाळा प्रतिनिधी

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठान, धवलनगर, अकलूज संचलित प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा येथे ‘अग्निशामक व गॅस सुरक्षा : प्रतिबंध, तयारी आणि आपत्कालीन उपाययोजना’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व रसायनशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन निंबाळकर हे होते. तर आयक्यूएसी समन्वयक डॉ. ज्ञानदेव भोसले आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरुण चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिंदुस्तान फायर प्रोटेक्शन सिस्टीम, पुणेचे संचालक राहुल गावडे व लक्ष्मी वैभव गॅस एजन्सी, करमाळाचे गोपाळ वाघमारे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

राहुल गावडे यांनी आगीची प्रमुख कारणे, आगीचे विविध प्रकार, आगीची वर्गवारी, अग्निशामक यंत्रांचे प्रकार व त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करावा याचे सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच आगीपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती दिली.

गोपाळ वाघमारे यांनी एलपीजी गॅस सिलेंडर हाताळताना घ्यावयाची काळजी, गॅस गळती कशी ओळखावी, गळती झाल्यास करावयाच्या तातडीच्या उपाययोजना व प्रथमोपचार याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘सजग राहा, तयार राहा, सुरक्षित राहा’ असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ११.३० वाजता या कार्यशाळेला सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश सूर्यवंशी यांनी केले, तर आभार रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरुण चोपडे यांनी मानले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आयक्यूएसी व रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *