
करमाळा प्रतिनिधी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त तसेच 2025 हे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरे होत आहे. गोकुळाष्टमीस अर्थात आज 15 ऑगस्ट 2025 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 750 वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर करमाळा येथे पसायदान, भारतीय संविधान उद्देशिका आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

भारतीय ग्रंथालयाचे जनक पद्मश्री डॉ. एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांचा जन्मदिवस हा देशभरात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. करमाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सचिन तपसे यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 12 ऑगस्ट 1892 रोजी मद्रास प्रांतातील शियाली या गावी जन्मलेल्या डॉ. एस आर रंगनाथन यांनी देशातील ग्रंथालय चळवळीसाठी मोठे योगदान दिले आहे. ग्रंथालय शास्त्राचे नियम, शास्त्रीय द्विबिंदू, ग्रंथ वर्गीकरण पद्धती, ग्रंथालया कायदा व सार्वजनिक ग्रंथालय चळवळ या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
हे सर्व कार्यक्रम राबवत असताना करमाळा नगरपरिषदेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, वाचक,सभासद विद्यार्थी विद्यार्थिनी इत्यादी बहुसंख्येने उपस्थित होते.