करमाळा चिखलठाण 

करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे केळी संशोधन सुरू करण्याच्या संदर्भात करमाळा व माढा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेऊन मागणी केली या संदर्भात लवकरच संबंधित अधिकाऱ्या समावेत बैठक लावून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी या शिष्टमंडळाला कृषिमंत्र्यांनी दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी पिकाखालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. देशातील सर्वाधिक निर्यातक्षम केळीची निर्यात करणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख झाली असून यापुढील काळात मोठ्या संधी या पिकासंदर्भात असल्याने व हे अव्वल स्थान टिकवण्यासाठी या विकास संदर्भातील पुढील संशोधन होणे गरजेचे असल्याने गेल्या अनेक दिवसापासून केळी उत्पादक शेतकऱ्यांची जिल्ह्यात केळी संशोधन सुरू करण्याची मागणी होत आहे. या संदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही प्रयत्नशील आहेत. परंतु नुकताच कृषी मंत्री पदाचा कार्यभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील करमाळा व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे हे केळी संशोधन केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे त्यांना केली. यावेळी करमाळा तालुक्यातील कंदर येथील कृषी विभागाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी व निर्यातदार किरण डोके, बेंबळे तालुका माढा येथील कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सोमनाथ हुलगे,  बारामती सहकारी बॅकेचे चेअरमन सचिन सातव, बारामती दुध संघाचे संचालक संदीप जगताप, टेंभुर्णी येथील दत्तात्रय माळी, अंगद पाटील, अण्णासाहेब कदम, संदीप फराडे यांच्यासह करमाळा व माढा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यामध्ये केळीचे क्षेत्र वाढत असले तरी या पिकासंदर्भात अनेक नवीन अडचणी समोर येऊ लागले आहेत यासाठी या पिका संदर्भातील संशोधन जिल्ह्यातच होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाच्या मालकीची जमीन करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे उपलब्ध असल्याने या ठिकाणी हे केंद्र झाल्यास याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असून जिल्ह्यामध्ये केळी निर्यातीमध्ये वाढ होण्याबरोबरच पिकाच्या दर्जा संदर्भात ही काम केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याची बाप उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *