
जेऊर प्रतिनिधी
गरजुंना अर्थसाहाय्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या जेऊर तालुका करमाळा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत संपन्न झाली. संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात अकरा लाख रुपये नफा झाला असून सात कोटी रुपयाचा टप्पा पार केला आहे. यावर्षीही सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नागेश झांजुर्णे यांनी दिली.

पंचवीस वर्षांपूर्वी नवरात्र उत्सव मंडळातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जेऊर तालुका करमाळा येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेने स्थापनेपासून ऑडिट वर्ग ‘अ’ मिळवत संस्थेची आर्थिक प्रगती साधत विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष नागेश झांजुर्णे यांच्या उपस्थितीत संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात संपन्न झाली. यावर्षी संस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असून यानिमित्त वर्षभरात विविध उपक्रम

राबवण्यात येणार आहेत. संस्थेच्या वतीने भव्य सभागृहाची उभारणी करण्यात आली असून अल्प दरात सभासदांसह परिसरातील लोकांना याचा लाभ दिला जात आहे. संस्थेच्या वाटचालीत योगदान असलेल्या माजी संचालक व माजी कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापक मधुकर साबळे यांनी ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन केले. यावेळी सर्व करण्यात आलेल्या सर्व ठरावांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. तर सर्वसाधारण सभेला उपस्थित सर्व सभासदांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव प्रशांत पाथरुडकर, उपाध्यक्ष वनिता निर्मळ, संचालक बाळासाहेब सूर्यवंशी, संजय भोसले, मुरलीधर पोळ, प्रदीप घोलप, निखिल मोरे त्यांच्यासह जेऊरचे माजी सरपंच भास्कर खांडेकर, धनंजय शिरसकर, संजय गादिया, सुरेश पोळ यांच्यासह संस्थेचे बहुतांश सभासद उपस्थित होते.