
करमाळा प्रतिनिधी
करमाळा नगर परिषद अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापीत महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादित वस्तु व पदार्थ यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांच्या सक्षमीकरणाला आणि त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला बचत गट आठवडी बाजार चा भव्य शुभारंभ दि. 25/08/2026 मंगळवार रोजी मा.आ. जयवंतराव नामदेवराव जगताप सामाजिक सभागृह, किल्ला वेस, करमाळा येथे पार पडला.

या उपक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मलाताई गायकवाड, मुख्याधिकारी सचिन तपसे, श्रद्धा तपसे, सर्व नगरसेविका व सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत पार पडला.
उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन विविध उत्पादनांची पाहणी व खरेदी केली. महिलांना स्थानिक पातळीवर थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हक्काचा ग्राहक मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याप्रसंगी नगराध्यक्षा यांनी शहरातील बचत गटातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली व पुढील काळात शहरातील पदार्थ आणि वस्तु यांचेसाठी उद्योग भवन निर्माण करण्याचे आश्वासन दिले. प्रियंका गायकवाड यांनी आपले मनोगत प्रसंगी उपक्रमा बाबत नगराध्यक्षा यांनी महिलांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याचे व महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच यशोदा परदेशी यांनी या उपक्रमासंदर्भात नगरपरिषदेचे आभार व्यक्त केले.
या आठवडी बाजारात महिला बचत गटांनी तयार केलेले उत्कृष्ठ दर्जाचे घरगुती खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तु, सेंद्रिय भाजीपाला, इतर दैनंदिन उपयोगाची उत्पादने विक्री साठी ठेवण्यात आली होती. करमाळा शहरातील नागरिकांनी सदर ठिकाणी भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करत महिला उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
या प्रसंगी नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, महिला व बालकल्याण समितीचे पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी, शहर स्तर संघ पदाधिकारी, बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.