शेटफळच्या शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गायीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात साजरा केला

चिखलठाण (बातमीदार) शेटफळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गायीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात साजरा केला यानिमित्ताने गाव जेवण घालून संध्याकाळी भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे . ” हौसेला मोल नसते,” म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणी हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका.  अशाच एक शेटफळ येथील हौशी शेतकरी परमेश्वर गोरख पोळ यांनी चक्क आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठवले तसेच गावातील सर्व महिलांना आपल्या शेतातील गोठ्यावर बोलवून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम साजरा केला यावेळी एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो अशाच प्रकारे सर्व सोपस्कार पार पडले. गोठ्यात मंडप घालण्यात आला यामध्ये लाईट डेकोरेशन करण्यात आले होते. गायीला सजवून ओवाळण्यात आले.सर्वांचे गायी सोबत फोटो सेशन झाले. गायीला हिरवा चारा पंचपकवानाचे जेवण घालण्यात आले आलेल्या सर्व पाहुणे मंडळी महिला व ग्रामस्थांनाही जेवणाचा बेत करण्यात आला होता. नंतर गावातील भजनी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम झाला.

प्रतिक्रिया:- परमेश्वर गोरख पोळ (गोपालक शेटफळ ता करमाळा) गावातील एका नातेवाईकाने चार पाच वर्षांपूर्वी गावरान गायीची छोटी  कालवड आम्हाला सांभाळण्यासाठी दिली. तिला आम्ही उत्तम प्रकारे सांभाळली. आमच्या सर्व घरादाराला तिचा चांगलाच लळा लागला आहे. आतापर्यंत तिने दोन वेत दिले.दुधही भरपूर देते  आमची गाय फारच गुणवान आहे आमच्या घरातील एक सदस्यच बनली आहे.  आमच्याकडे ती आल्यापासून आमच्या घरात लक्ष्मी नांदू लागली अशी आमची श्रद्धा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला देव मानले आहे  तिचाही सन्मान व्हावा व तिच्या ॠणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *