
करमाळा प्रतिनिधी
खा. रामदास आठवले यांची राज्यसभेवर तिसऱ्या वेळेस निवड झाल्याबद्दल, कुर्डूवाडी येथे जाहिर नागरी सत्कार ठेवण्यात आला होता. सदरच्या कार्यक्रमासाठी विविध स्तरातील अनेक मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. त्याचप्रमाणे पूर्वीच्या भारतीय दलित पॅंथर मधून घडलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी देखील कुर्डूवाडी येथील कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी पूर्वीचे भारतीय दलित पँथरचे जिल्हाध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांनी सांगितले कि, पूर्वी भारतीय दलित पॅंथरच्या मुशीतून घडलेल्या अनेक कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे की, भारतीय दलित पॅंथरला

पुनर्जीवित करून संविधानाच्या रक्षणासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी, पुर्वीच्या पँथरला पुनर्जीवित करणे आता काळाची गरज आहे. पुर्वी पॅंथरच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली गेलेली आहे. व याच माध्यमातून आंबेडकरी चळवळीला देखील मोठी भरारी मिळाली आहे. त्यामुळेच प्रशासकीय पातळीवर देखील सर्वसामान्य व्यक्तींची अडलेली कामे, अधिकारी देखील पॅंथर संघटनेच्या आंदोलनाच्या व सततच्या पाठपुराव्याच्या भीतीने लवकरात-लवकर करत होती.

रिपाई हा जरी बाबासाहेबांच्या स्वप्नातील पक्ष असला तरी, त्याच समांतर पातळीवर पँथर संघटना उभा करणे सध्या काळाची गरज आहे. त्यामुळे परत एकदा ह्याच भारतीय दलित पॅंथरच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी, तसेच संविधानाच्या रक्षणासाठी खा. रामदास आठवले यांनी त्यांच्या पातळीवर जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, परत एकदा समाजाच्या हिताचा विचार करून, नवीन पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर करावी. अशा प्रकारे उपस्थित सर्व जुन्या

भारतीय दलित पॅंथर कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दशरथ अण्णा कांबळे यांनी खा. आठवले यांच्या समोर बोलून दाखविली. त्यामुळे येत्या काळामध्ये दलित पॅंथरचे परत एकदा पूर्वीप्रमाणेच आंदोलन व आंबेडकरी चळवळीचा दरारा निर्माण करण्यासाठी, खा. आठवले देखील या सर्व बाबींना योग्य प्रतिसाद देतील का? हे पाहणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.
