
करमाळा प्रतिनिधी
जेऊरवाडी येथे सोमवार दि. 10 रोजी पाहटे 3 वाजण्याच्या सुमारास 3 ठिकाणी तर जेऊर येथे एका ठिकाणी चोरी झाली आहे. या घटनेने करमाळा तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी चोरट्यांनी केलेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. जेऊरवाडी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घरपोडी करणाऱ्या पाच व्यक्ती असल्याचे उघडकीस आले आहे.

अंकुश प्रल्हाद शिरसकर वय 65 हे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना काठीने मारहाण केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. जेऊरवाडी गावातील अंकुश प्रल्हाद शिरसकर, वामन एकनाथ निमगिरी, भिकू गजरा निमगिरे या तीन ठिकाणी चोरी झाली. यामध्ये चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे.

या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी भेट देऊन समक्ष पाहणी केली. याबाबत शिवाजी शिरसकर यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक टिळेकर करत आहे. या दरम्यान निर्मळ वस्ती जेऊर येथे देखील घरफोडी करण्यात आली आहे.
