
अकलूज दरबारी एकमेकांचे विरोधक आले एकत्र
करमाळा प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व दिग्विजय बागल या प्रमुख तीन गटात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या बिनविरोधासाठी समझोता घडवून आणलेला आहे. त्यामुळे बिनविरोधाचा मार्ग मोकळा झाला आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आमदार रणजित सिंह मोहिते-पाटील यांच्याकडे शिवरत्न बंगल्यावर गुरुवारी जाऊन भेट घेतली होती. शुक्रवारी दुपारी चार वाजता अकलूजमध्ये आमदार रणजित सिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप व

दिग्विजय बागल या प्रमुख नेत्यात निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठक झाली. तब्बल दोन तास बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जगताप, पाटील व बागल या तीनही गटात समझोता घडवून आणला. बैठकीस यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील, देवानंद बागल, अजित तळेकर, आदी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीची एकूण १८ जागांच्या संचालक मंडळासाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये यापूर्वीच माजी आमदार जगताप गटाने व्यापारी मतदार संघातील दोन जागा बिनविरोध जिंकल्या असून हमाल- तोलार मतदार संघाची एक जागा सावंत गटाने बिनविरोध जिंकली आहे. मोहिते-पाटील यांनी केलेल्या समझोत्यानुसार उर्वरित १५ संचालकांच्या जागे

पैकी सोसायटी मतदार संघातील सर्व ११ जागा माजी आमदार जगताप गटाला बिनविरोध द्यावयाच्या तर ग्रामपंचायतीच्या एकूण ४ जागेपैकी २ जागा माजी आमदार नारायण पाटील गटाला तर २ जागा बागल गटाला देण्याचे ठरले आहे.