
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आजही अनेक गरीब, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे स्वतःच्या हक्काच्या पक्क्या घरापासून वंचित आहेत. शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. परंतू करमाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये अनेक पात्र व गरजू नागरिकांचा समावेश झालेला नाही. काही नागरिक विविध कारणांमुळे सर्वेक्षण अथवा लाभार्थी यादीच्या प्रक्रियेतून वंचित राहिले आहेत. त्यामुळे अशा पात्र नागरिकांना शासनाच्या महत्त्वपूर्ण प्रधानमंत्री आवास व इतर घरकुल योजनेचा लाभ मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असून कोणीही सदरच्या योजनेपासून वंचित राहू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष अमरजित साळुंके यांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांच्याकडे केली.

यावेळी आदिनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष महेशराजे भोसले, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शरद नेटके, ॲड.प्रशांत बागल, भीमदलचे अध्यक्ष सुनील भोसले, मुस्तकीम पठाण जिलानी मनेरी, विशाल साबळे यांचेसह योजनेचे वंचित नागरिक उपस्थित होते.
………………….
संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना देऊन गावनिहाय वंचित पात्र लाभार्थींची यादी तयार करावी, त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करावी आणि शासनाच्या नियमानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये समावेश करण्यासाठी कार्यवाही करावी. गरीब व गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळणे ही सामाजिक जबाबदारी असून, कोणताही पात्र नागरिक केवळ प्रशासकीय प्रक्रियेतील त्रुटीमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे – अमरजित साळुंके (करमाळा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार )
………………
ज्या लाभार्थींची नावे घरकुल योजनेच्या यादीत आलेली नाहीत त्यांनी अपिला मध्ये जाऊन प्रकल्प संचालक, सोलापूर यांचे नावे पंचायत समिती येथे फेरसर्वेक्षण साठी अर्ज करावा आणि ज्यांना नव्याने घरकुल मागणी करायची असेल त्यांनी ग्रामपंचायत च्या ग्रामसभेच्या ठरावा मध्ये नाव समावेश करून पंचायत समिती कडे मागणी करावी – महादेव शिंदे (सह. गटविकास अधिकारी पंचायत समिती, करमाळा)