
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरामध्ये दिवसेंदिवस खड्ड्यांचे साम्राज्य वाढत असून, नागरिकांना जीव मुठीत धरून दररोज ये-जा करावी लागत आहे. शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी रुग्णांना या खड्ड्यांमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, या गंभीर समस्येकडे करमाळा नगरपालिका गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप माजी नगरसेविका सविता जयकुमार कांबळे यांनी केला आहे.

शहरालगत विविध कंपन्यांच्या नेटवर्क वायरिंगची कामे सुरू असून, त्यासाठी रस्त्यांच्या विविध भागांत खोदकाम करून वायर टाकण्यात येत आहेत. या कामांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संबंधित कामांसाठी नगरपालिकेची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे कांबळे यांनी म्हटले आहे.
“शहरातील रस्ते खोदून नागरिकांना त्रास होत असताना नगरपालिका याकडे डोळेझाक का करत आहे ? कोणाचे हितसंबंध जपण्यासाठी शहराची अशी दुरवस्था केली जात आहे का ?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याचे कांबळे यांनी सांगितले. या परिसरात आठवडी बाजार भरत असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने भाजीपाला विक्रेत्यांसह ग्राहकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पाण्यात भाजीपाला बुडत असल्याने नागरिकांना नाईलाजाने अशाच परिस्थितीत खरेदी करावी लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“नागरिकांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असताना नगरपालिका याकडे गांभीर्याने पाहणार कधी?” असा प्रश्न कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
सत्ताधाऱ्यांच्या प्रभागांपुरतीच विकासकामे ?
करमाळा शहरातील विविध विकासकामांबाबतही माजी नगरसेविका सविता कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सध्या शहरात सुरू असलेली विविध कामे ही केवळ सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागांमध्येच होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
“करमाळा शहरातील इतर प्रभागांमध्ये नागरिक राहत नाहीत का ? केवळ राजकारणासाठी इतर प्रभागांतील नागरिकांना ‘तुमचे काम करतो’ असे सांगून वेळ मारून नेला जात आहे का ?” असा सवाल त्यांनी केला.
नगराध्यक्षांना शहरातील सर्वच प्रभागांतील नागरिकांनी मतदान केले आहे. त्यामुळे सत्तेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रभागांचा समान विकास करण्याची जबाबदारी पार पाडावी, असेही कांबळे यांनी म्हटले आहे.
करमाळा शहरातील खड्डे, रस्त्यांची दुरावस्था आणि अनधिकृत अथवा अपूर्ण खोदकामांबाबत नगरपालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.