
करमाळा प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे, ऊस गाळप केलेले पैसे अद्यापपर्यंत दिले नसल्यामुळे, ६ सप्टेंबर रोजी तालुक्यातील सर्व समविचारी संघटनांनी साखर आयूक्त पुणे यांच्या संकुलाबाहेर बेमुदत हालगीनाद आंदोलन

करण्याचा इशारा दिला होता. व तशा प्रकारे विविध संघटनांनी एफ.आर.पी. थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन, पुणे येथे जाण्याचे नियोजन सुरु केले होते. परंतु अचानक जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटा येथे पोलीसांकडून झालेल्या

अमानूष लाठीमाराच्या निषेधार्थ सर्व बहूजन समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. त्याचप्रमाणे करमाळा शहरामध्ये सुध्दा ६ सप्टेंबर रोजी भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सदरील मोर्चाला जाहिर पाठींबा देण्यासाठी व

सध्याचा राज्यामध्ये उद़्भवलेला सामाजिक प्रश्न, या पार्श्वभुमीवर पुणे येथे ऊस बीलासाठी होणारे बेमुदत हालगीनाद आंदोलन काही काळ स्थगित करण्यात आले आहे. तशा प्रकारचे पत्र साखर आयूक्त पुणे यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले

असल्याची माहिती शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे सदरच्या आंदोलनाची पुढील सुधारित तारीख व वेळ लवकरच प्रसिद्धी माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना कळविली जाईल असेही सांगण्यात आले आहे. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जि. कार्याध्यक्ष रविंद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, रासप सोलापूर जि. सरचिटणीस अंगद देवकते, पत्रकार जयंत दळवी, मस्कर तात्या, शहाजी देशमुख, रयत संघटनेचे वारगड, प्रहार संघटनेचे ता.अध्यक्ष संदिप तळेकर, संपर्क प्रमुख सागर पवार इ. प्रमुख व्यक्ती उपस्थित होते.
…….चौकट…….
सध्या राज्यामध्ये उद़्भवलेल्या सामाजिक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही कायमच लढतोय. परंतु सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता बहुजन समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी व इतरांनी सुध्दा ६ सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनाला साथ देणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व संघटनातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी यांनी साखर आयूक्त पुणे यांच्या संकुलाबाहेरील हालगीनाद आंदोलन काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दशरथआण्णा कांबळे (शेतकरी कामगार संघर्ष समिती, संस्थापक अध्यक्ष)