

करमाळा प्रतिनिधी
उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी बंडगर, उपाध्यक्ष भारत साळुंखे, आदिनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, भिवरवाडी वांगी 4 सरपंच डॉ.भाऊसाहेब शेळके व देविदास तळेकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सातारा येथे शासकीय विश्रामगृह येथे भेट घेतली. उजनी जलाशय काठावरील शेतीपंपाची वीज देखील पाच तास करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांना केली. पण शिष्टमंडळाने आठ तास करण्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी पालकमंत्री म्हणाले की, उद्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय मांडेल कारण एल निनो मुळे वीज व पाणी हे दोन्ही विषय मंत्रिमंडळासमोर आहेत.

तुर्तास उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने आणखी एक तास वीज मिळवण्यात यश मिळवले त्यामुळे संघर्ष समितीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून आठ तास वीज होते की काय हे पाहायचे आहे.

तसेच सातारा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांचीही भेट शिष्टमंडळाने घेतली. त्यावेळेला धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना दूरध्वनी द्वारे उजनी जलाशय काठावरील शेतीपंपाची वीज पाच तास करण्याची सूचना केली. त्यावेळेला कार्तिकेयन यांनी तात्काळ हा निर्णय करतो असे आश्वासन दिले. त्यामुळे आता उजनी धरणग्रस्तांना व जलाशय काठावरील शेतकऱ्यांना आजपासून पाच तास वीज मिळण्यास मार्ग मोकळा झाला आहे यामुळे धरणग्रस्त भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच बरोबर महावितरणचे अधीक्षक अभियंता माने यांनाही तात्काळ या बदलाचं अंमलबजावणी करण्याची सूचना दोघांनी केली त्यामुळे उजनी जलाशय काठावर तात्काळ पाच तास वीज सुरू होईल यात शंका नाही.