
आम्ही कर्जबाजारी झालो… आता आमचे काय होणार ?
करमाळा प्रतिनिधी
सध्या बाजारपेठेत प्रचंड मंदी असून ही मंदी मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. वाढलेली महागाई , ऑनलाईन खरेदी अशा अनेक कारणांमुळे बाजारात सध्या प्रचंड मंदीचे सावट आहे.
या मुळे अनेक मध्यमवर्गीय व किरकोळ व्यापारी कर्ज बाजारी झाले आहेत. आपण बारकाईने पाहिले असता एवढ्यात काही किरकोळ व्यापारी यांनी कर्जबाजारी झाल्या मुळे आत्महत्या देखील केल्या आहेत. अशा अनेक बातम्या आपल्या पुढे आल्या

आहेत. तर काही जण कर्जबाजारी झाल्यामुळे आपले गाव, शहर सोडून इतर जिल्ह्यात राहण्यास जात आहेत.
हा वर्ग मोठा असून असंघटित असल्यामुळे राज्य शासन व केंद्र सरकारचे या वर्गा कडे कायम दुर्लक्ष झाले आहे. सरकारी कर्मचारी व शेतकरी वर्ग यांच्यासाठी अनेक कर्ज योजना आहेत. परंतु या वर्गासाठी एकही योजना नाही. या वर्गातील लोकांना आता योग्य आर्थिक सहकार्यची खरी गरज आहे.

मागणी मा.खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवेदन देऊन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून किरकोळ व्यापारी कल्याणकारी संस्था, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पवन कोठारी यांनी केली आहे.
कर्जबाजारी होण्याचे हे आहेत कारणे
१. वाढती महागाई व उत्पन्न कमी.
२. सरकारी बँक व नॅशनल बँक मधून या वर्गाला कधीच कर्ज मिळत नाही. परिणामी हा वर्ग खाजगी फायनान्स जाळ्यात अडकला.

३. फायनान्स कंपन्याचे अधिकचे नियमबाह्य व्याजदर व दंड यामुळे हा वर्ग अधिक आर्थिक संकटात आला.
४. मुद्रा योजना फक्त वशिला असणाऱ्यांसाठी यामुळे या वर्गाला फायदा झालाच नाही.
ही मदत गरजेची आहे

१. सरकारी बँक व नॅशनल बँक मधून या मध्यमवर्गीय व किरकोळ व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा व्हावा.
२. शेतकऱ्यां प्रमाणे या वर्गासाठी देखील राज्य व केंद्र शासनाने योजना राबवाव्यात.
३. किरकोळ व्यापाऱ्यांना रुपये पाच लाख पर्यंत कर्जपुरवठा करताना सिबिल स्कोर ची अट कमी करावी.

४. राज्य शासनाने रुपये पाच लाख पर्यंतचे कर्ज किरकोळ व्यापाऱ्यांना वाटप करण्याचे आदेश सरकारी बँक,नॅशनल बँकांना द्यावेत.