सोलापूर, दि. १७ (जिमाका) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि मेरा युवा भारत (MY Bharat) यांच्या वतीने ‘विकसित भारत युवा नेते संवाद २०२७’ अंतर्गत प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रश्नमंजुषेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केवळ पाच मिनिटांचा वेळ देऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मेरा युवा भारत, सोलापूरचे जिल्हा युवा अधिकारी आकाश शाहाजी जिनगर यांनी केले आहे.

या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेरा युवा भारत (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी अथवा लॉगिन करून आपला सहभाग नोंदवावा. प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे.

महाविद्यालयातील सर्व पदवीपूर्व विद्यार्थी तसेच विशेषतः एनएसएस, बीएसजी स्वयंसेवकांनी या राष्ट्रीय उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे आयोजित ‘विकसित भारत युवा नेते संवाद २०२७’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. याशिवाय पात्र एनएसएस, बीएसजी स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिन संचलन २०२७ साठी एनएसएस, बीएसजी पथकाचा भाग होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रीय स्तरावर आपले विचार, नेतृत्वगुण आणि कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. पात्र युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळू शकते.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, पदवीपूर्व विद्यार्थी आणि एनएसएस, बीएसजी स्वयंसेवकांनी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी आकाश जिनगर यांनी केले आहे.

प्रश्नमंजुषा व नोंदणीसाठी MY Bharat – VBYLD २०२७ पोर्टलला भेट द्यावी.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *